सातारा जिल्हाहोम

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांवरील गोंधळाविरोधात पैलवानांचा आक्रोश मोर्चा

दोन हजार पैलवानांची कराडहून मुंबईकडे कूच; गदा सरकारकडे जमा करण्याचा इशारा

कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिल्ह्यातील पैलवानांनी बुधवारी (दि. ११) कराड येथून मुंबईच्या दिशेने आक्रोश मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. या मोर्चात ४० महाराष्ट्र केसरी, १० हिंदकेसरी आणि सुमारे दोन हजार पैलवानांनी आपल्या मानाच्या गदांसह सहभाग घेतला.

भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या कराड (कार्वे नाका) येथील स्मारकाला अभिवादन करून सकाळी सुमारे अकरा वाजता या मोर्चास प्रारंभ झाला. त्यानंतर सर्व पैलवान मुंबईकडे रवाना झाले.

मोर्चाच्या प्रारंभी कार्वे नाका येथे झालेल्या कार्यक्रमात डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, सांगलीचे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी नामदेव मुळे, साताऱ्याचे महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील शेकडो पैलवान उपस्थित होते.

यावेळी बोलताना डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या परंपरेबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, सुमारे साठ वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची एकसंध परंपरा सुरू आहे. मात्र यावर्षी राज्यात चार वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार असल्याने कुस्ती क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला आहे. ही परिस्थिती तातडीने थांबवणे आवश्यक आहे.

पैलवानांसाठी शासनाकडून अनेक सुविधा जाहीर असल्या तरी त्या प्रत्यक्षात मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या प्रश्नांवर लवकर तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र केसरी पदाच्या मानाच्या गदा सरकारकडे जमा करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या आक्रोश मोर्चामुळे कुस्ती क्षेत्रातील असंतोष पुन्हा एकदा उघड झाला असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पैलवानांनी केली आहे.

Related Articles