सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाजपचा होणार असे सातत्याने सांगणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचा जिल्हाध्यक्ष बनवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काॅग्रेस व सर्वपक्षीयांनी कराड तालुका पंचायत समितीवर सर्वपक्षीय सभापती, उपसभापती बनवण्यासाठी गोळा बेरीज सुरू केली असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
कराड तालुका पंचायत समितीत एकूण २४ सदस्य आहेत यामध्ये भाजपचे १३ सदस्य असून राष्ट्रवादी अजित पवार व राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, या सर्वपक्षीयांचे ११ सदस्य आहे. बहुमतासाठी तेरा सदस्यांची गरज आहे भाजपा कडे सभापती उपसभापती बनवण्यासाठी पुरेसे संख्याबळ आहे मात्र सर्व पक्षीयांना दोन सदस्य कमी पडतात. ही गरज पूर्ण करण्याची जबाबदारी माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव व रयत संघटनेचे नेते ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यावर सोपवण्यात आली असल्याची चर्चा आहे. उदयसिंह पाटील यांची रयत संघटना आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचे सख्य जिल्ह्यात सर्वश्रुत आहे नुकत्याच झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत ऍडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या रयत संघटनेचे काही सदस्य भाजपमधून विजयी झाले आहेत हे सदस्य आपल्या नेत्यांच्या ऋणातून उतराईतून मुक्त होण्यासाठी उंडाळकर यांना मदत करू शकतात अशी चर्चा आहे. त्यातच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेना महायुती आहे, त्यामुळे सभापती उपसभापती हा महायुतीचा होईल अशी परिस्थिती आहे. कराड पंचायत समितीत राष्ट्रवादी शिवसेना व सर्व पक्षीय स्वतःचा सभापती बनवण्याच्या तयारीत असल्याचे चित्र असून भाजपचे विरोधी राष्ट्रवादी अजित पवार गट चार, राष्ट्रवादी शरद पवार गट तीन, काँग्रेस दोन, शिवसेना शिंदे गट दोन, सदस्य बळ आहे. तर भाजपकडे. जिल्हाअध्यक्ष. डॉ अतुल भोसले गटाकडे आठ सदस्य, व कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्याकडे पाच असे एकूण १३ सदस्य आहेत बहुमतासाठी जादूई आकडा १३ आहे. त्यामुळे एक दोन सदस्य इकडे तिकडे वळवणे विरोधी सर्वपक्षीयांना फारसे अवघड नाही. अशी परिस्थिती आहे.त्यासाठी डावपेच आखले जात असल्याची चर्चा तालुक्यात सुरू असून ऍडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या उपकाराचे उतराईतून मुक्त होण्यासाठी ही पावले उचलली जाणार की काय ? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
भाजपमध्येच सभापती उपसभापती निवडीवरून संघर्ष सुरू झाला आहे. त्याबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार झाली असल्याचे समजते.
कराड उत्तरमधील उमेदवाराला सभापती करण्यासाठी भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी डाव टाकला आहे. त्यांच्या या पवित्र्याने कराड दक्षिणमधील भाजपचे आमदार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांची कोंडी झाली असून कराड तालुक्यातील भाजपाची पहिली महिला झेडपी अध्यक्षा करण्याच्या प्रयत्नांना देखील यामुळे खीळ बसली आहे.
भाजप अंतर्गत सुंदोपसुंदी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मौन बाळगले आहे. कराड तालुक्यातील दक्षिण आणि उत्तरमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा पैरा पाहता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापती निवडीत काहीही घडू शकते, असे सध्या चित्र आहे.
कराड पंचायत समिती अनेकदा असे चमत्कार घडून आले आहे बहुमत असतानाही विरोधी गटाचा सभापती उपसभापती झाल्याच्या घटना आहेत. त्यामुळे कराडमध्ये पुन्हा असा काही प्रयोग होणार का ? याची चर्चा सुरू झाली आहे यातच सभापती पद कराड उत्तरला मिळावे असा आग्रह कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी केला असल्याचे भाजप अंतर्गत बोलले जाते तर सर्वाधिक जागा आम्ही जिंकल्याने कराड दक्षिण मधील भाजपचा सभापती होईल असा ठाम विश्वास डॉ.अतुल भोसले समर्थकांना वाटतो. कराड तालुका पंचायत समितीवर आज अखेर काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व राहिले आहे त्यामुळे भाजपला आता कोणत्याही परिस्थितीत कराड तालुका पंचायत समितीत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. असे असले तरी पाटील यांच्या रयत संघटनेने आ. मनोज घोरपडे अनेक अडचणीच्या काळात साथ दिली आहे ही साथ पुढील काळासाठी ही ठेवण्यासाठी कदाचित दोन सदस्यांचा जादूई आकडा गाठण्यासाठी काहीही गडबड घडू शकते. किंवा एक जरी सदस्य इकडे तिकडे झाला तरी ईश्वर चिट्ठी वर सभापती उपसभापती निवड येऊ शकते. त्यामुळे कराड पंचायत समितीत भाजप ज्या भ्रमात वावरते तो भ्रमाचा भोपळा ही फुटू शकतो. यातून राजकीय समीकरणे ही बदलू शकतात. अशी चर्चा तालुक्यात रंगू लागल्याचे चित्र दिसत आहे.