सातारा जिल्हाहोम

कराड-उंब्रज सिंगल पिलर उड्डाणपुलासाठी निधी मंजूर

नितीन गडकरींचे पृथ्वीराज चव्हाण यांनी मानले आभार; वाहतूक कोंडी कमी होण्यासह संभाव्य जीवितहानी टाळण्यास

कराड/प्रतिनिधी : –

कराड शहर व तालुक्यातील उंब्रज ही महत्वाची बाजारपेठ असून, या दोन्ही गावांतून राष्ट्रीय महामार्ग (NH-48) जातो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांची समस्या निर्माण होत होती. कराड शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार शहरातील विद्यमान भरीव उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.

याच धर्तीवर उंब्रज येथेही सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांनी उंब्रज येथे प्रत्यक्ष भेट देऊन पुलाची पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांची ही मागणी रास्त असल्याचे लक्षात आल्याने २४ ऑगस्ट २०२३ पासून त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे तसेच फोनवरून सातत्याने पाठपुरावा केला.

या पत्राच्या आधारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी विचारात घेऊन उंब्रज येथील पुलाची व्यावहारिकता तपासण्याचे निर्देश दिले. त्यानुसार NHAI च्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उंब्रज येथे येऊन पुलाची पाहणी केली. त्यानंतर या अधिकाऱ्यांसमवेत पृथ्वीराज चव्हाण यांची बैठक होऊन पुलाच्या आराखड्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती.

अधिकाऱ्यांच्या व्यावहारिकता तपासणीनंतर विकासकामांना प्राधान्य देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कराड व उंब्रज येथे सिंगल पिलर उड्डाणपूल उभारण्यासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, संभाव्य जीवितहानी टाळण्यासही हातभार लागणार आहे. याबाबतचा निधी मंजूर झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे पृथ्वीराज चव्हाण यांना दिली आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कराड व उंब्रज या दोन्ही ठिकाणी वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या दोन्ही ठिकाणी सिंगल पिलर उड्डाणपूल होणे अत्यंत आवश्यक होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक निर्णय घेत निधी मंजूर केल्यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल. कराड तालुक्याच्या विकासासाठी हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे.

कराड व उंब्रज येथील सिंगल पिलर उड्डाणपुलासाठी निधी मंजूर केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कराड तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.

Related Articles