आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

हकालपट्टी ते सन्मानाची बढती   : रामकृष्ण वेताळ यांची नियुक्तीने हकालपट्टी करणाऱ्याला चपराक

महिनाभरातच बदलले चित्र, पक्षात वाढली ताकद ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून किसान मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी

 

कराड / प्रतिनिधी : –

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात झालेल्या अंतर्गत घडामोडींनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात चांगलीच खळबळ उडवली होती. भाजपाचे स्थानिक नेते रामकृष्ण वेताळ यांच्यावर जिल्हा कार्यालयातून पुढील पाच वर्षांसाठी हकालपट्टीचे पत्र काढण्यात आले होते. मात्र अवघ्या एका महिन्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वेताळ यांची किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी

कराड उत्तर मतदारसंघातील कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातून रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नी विद्या वेताळ यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. या निर्णयामुळे नाराज होत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या गटात त्यांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या अधिकृत उमेदवारांचे आव्हान होते.

मात्र रामकृष्ण वेताळ यांच्या आक्रमक प्रचारशैली आणि विद्या वेताळ यांच्या अचूक रणनीतीमुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचा पराभव करत त्यांनी विजय मिळवला. सातारा जिल्ह्यातून अपक्ष म्हणून निवडून येणाऱ्या त्या एकमेव उमेदवार ठरल्या.

निर्णयाकडे लागलेले राजकीय लक्ष

पत्नीच्या विजयानंतर रामकृष्ण वेताळ कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपकडून अन्याय झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते शिवसेना किंवा अन्य पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र वेताळ यांनी पक्षश्रेष्ठींवर विश्वास दाखवत संयमाची भूमिका घेतली.

वरिष्ठांकडून सन्मानपूर्वक बढती 

या सर्व घडामोडींनंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रामकृष्ण वेताळ यांची किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. त्यामुळे हकालपट्टीचा निर्णय घेणाऱ्या स्थानिक नेतृत्वाला अप्रत्यक्षरीत्या वरिष्ठांकडून संदेश देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या निर्णयामुळे कराड उत्तर मतदारसंघातील भाजपातील अंतर्गत मतभेद कमी होण्यास मदत होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles