सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्याचे यंदा ऊसाचे इतिहासातील विक्रमी गाळप – डॉ. सुरेश भोसले

कराड/प्रतिनिधी : –

कृष्णा कारखान्याने यंदाच्या हंगामात कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप करून, १४ लाख १९ हजार ३०६ मे. टन ऊसाचे कारखान्याच्या इतिहासातील विक्रमी गाळप साध्य केले आहे. ऊस पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांनी कृष्णा कारखान्यास प्राधान्य दिले, ही कारखान्याच्या विश्वासार्ह व पारदर्शक कामकाजाची पोचपावती आहे. उत्पादनवाढ, आर्थिक शिस्त आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे कारखान्याची सर्वांगीण प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

कृष्णा कारखान्याच्या ६६ व्या गळीत हंगामाची सांगता चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, पंचायत समिती सदस्य मनोज पाटील, पैलवान धनंजय पाटील, प्रमोद पाटील, वैभव जाखले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, डॉ. सचिन पवार, जनरल मॅनेजर (टेक्निकल) बालाजी पबसेटवार, जनरल मॅनेजर (केन) दादासाहेब शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चेअरमन डॉ. सुरेश भोसले पुढे म्हणाले, यावर्षी आपण शेतकरी सभासद, तोडणी वाहतूकदार, कंत्राटदार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्याच सहकार्याने हा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. कारखान्याचा तोडणी वाहतूक खर्चाचा एकही रुपया बुडाला नाही. तसेच आर्थिक शिस्त राखल्याने, वेळेत बिल देणारा कारखाना म्हणून संस्थेची ओळख निर्माण झाली आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच ही प्रगती शक्य झाली आहे.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी गळीत हंगामाचा आढावा सादर केला. ते म्हणाले, चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली सन २०२५- २६ च्या गळीत हंगामात १४ लाख १९ हजार ३०६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर प्रत्येक सभासद, कामगार, अधिकारी व ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेच्या परिश्रमांची साक्ष आहे. आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर आणि शेतकरी व कारखाना समन्वय यामुळे यंदाचा हंगाम समाधानकारक ठरला. ऊस वाहतूक, गाळप प्रक्रिया आणि वेळेत देयक अदा करण्यावर व्यवस्थापनाने विशेष भर दिला असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

प्रारंभी संचालक अविनाश खरात व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शारदाताई खरात यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या ऊसतोडणी वाहतूकदार, प्रमुख अधिकारी, शेती विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच डॉ. विजय कणसे, डॉ. सचिन पवार, तसेच स्पर्धा परीक्षेत उज्वल यश मिळवल्याबद्दल आरती पवार, प्रथमेश पवार, जीवन पवार यांचाही सत्कार करण्यात आला. संचालक बाबासो शिंदे यांनी आभार मानले.

उच्चांकी गाळपाबद्दल सत्कार

कृष्णा कारखान्याने यंदाच्या हंगामात ऐतिहासिक उच्चांकी गाळप केले आहे. याबद्दल कडेगाव येथील शेतकरी सभासद ब्रिजराज मोहिते, संपत माने, अंकुश यादव, अर्जुन पवार, सचिन कदम यांनी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार केला.

Related Articles