कराडला 28 फेब्रुवारीला रस्ता सुरक्षा दौडचे आयोजन – मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे

कराड/प्रतिनिधी : –
उप-प्रादेशीक परिवहन कार्यालयाच्या वतीने शनिवार 28 फेब्रुवारी रोजी कराडला ‘रस्ता सुरक्षा दौड-2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. रस्ते अपघातात दुचाकीस्वार व पादचाऱ्यांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी यावर्षी दुचाकीस्वार व पादचारी वाचवा चा संदेश या दौडव्दारे देण्यात येणार असल्याची माहिती मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रस्ता सुरक्षा दौडची माहिती देयासाठी आयोजित केलेल्या पत्रकात परिषदेत ते बोलत होते. यावेळी, मोटर वाहन निरीक्षक सुदर्शन देवढे, स्वप्नील कदम, पंचायत समिती सदस्या अनिता वेताळ, उद्योजक सचिन पाटील, राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील, शशिकांत पाटील, दिलीप चिंचकर, ओंकार ढेरे, ब्रिजेश रावळ, अशोक पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, दौडमध्ये सहभागी होण्यासाठी विनाशुल्क ऑनलाईन नोंदणी होणाऱ्या लिंकचा शुभारंभ करण्यात आला. तसेच दौडमध्ये सहभागी होणाऱ्या सपर्धकांना देण्यात येणारे टी-शर्ट व मेडलचे अनावरण करण्यात आले.
चैतन्य कणसे म्हणाले, नागरिकांत रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता शनिवार 28 रोजी रस्ता सुरक्षा दौडचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 28 रोजी सकाळी सहा वाजता कृष्णा घाटावरून या दौडला प्रारंभ होणार आहे. कृष्णा घाट, चावडी चौक, मुख्य बाजार पेठेतून दत्त चौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, कन्याशाळा मार्गे चावडी चौक व पुन्हा कृष्णा घाटावर येऊन दौडचा समारोप होणार आहे. या दौडचे अंतर पाच किलोमीटर असणार आहे.
पंधरा वर्षावरील महिला व पुरूषांना दौडमध्ये सहभागी होता येणार आहे. दौडमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने लिंक दिली आहे. या लिंकवर विनाशुल्क नाव नोंदणी करण्यात येणार आहे. दौडमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल, ई-प्रमाणपत्र व नाष्टा देण्यात येणार आहे. दौडसाठी 2 हजार स्पर्धकांना नोंदणी करता येणार अअसल्याचे यावेळी सांगण्यात आले.



