एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांची नियुक्ती रद्द करा – जनआंदोलन न्यासाची मागणी

कराड/प्रतिनिधी : –
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) अध्यक्षपदासाठी झालेल्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला असून, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासाने या निर्णयाविरोधात तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सध्या परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या विवेक भिमनवार यांच्या नियुक्तीची सखोल चौकशी करून ती रद्द करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
न्यासाचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप आणि तालुकाध्यक्ष प्रितम हातेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. या निवेदनात परिवहन विभागातील कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तांत्रिक आणि अतांत्रिक कामांची योग्य विभागणी न करणे, नियमबाह्य पदोन्नती देणे, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा सामना केलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय बदली प्रक्रियेत कथित गैरव्यवहार, घरभाडे भत्त्याची वसुली न करणे, जातपडताळणी व अपंगत्व प्रमाणपत्रांच्या पडताळणीत त्रुटी, तसेच वैद्यकीय बिले प्रलंबित ठेवणे अशा विविध मुद्द्यांकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.
एमपीएससी ही राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील संस्था असल्याने अशा पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्याची अध्यक्षपदी नियुक्ती विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम करू शकते, अशी चिंता संघटनेने व्यक्त केली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गोपनीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची तपासणी करावी आणि दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशाराही न्यासाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.



