मलकापूर पालिकेकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व रेबीज लसीकरण
नागरिकांच्या तक्रारींची दखल; सुमारे 1150 भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात येणार

कराड/प्रतिनिधी : –
मलकापूर शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने याबाबत पालिकेकडे वेळोवेळी लेखी तक्रारी आल्या आहेत. त्याअनुषंगाने पालिकेकडून शहर परिसरात प्राणी जन्म नियंत्रण नियमानुसार सदर भटक्या कुत्र्यांचे निर्बिर्जीकरण व रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी स्वतंत्र शेड उभारण्यात आले आहे. त्यामध्ये ऑपरेशन करून मोकाट कुत्र्यांचे निर्बिर्जीकरण व रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे सुमारे 1100 ते 1150 भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात येणार येवून शहरामध्ये भटक्या कुत्र्यांसंदर्भात निर्माण झालेल्या भितीच्या वातावरणास आळा बसणार आहे. तसेच शहरामध्ये पिसळलेल्या कुत्र्यांचे वाढलेले प्रमाणही कमी होणार आहे.
मलकापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या आदेशाने शहरातील भटकी कुत्री व पिसळलेल्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुत्र्यांचे निर्बिर्जीकरण व रेबीज लसीकरणाची उपाययोजना तात्काळ सुरू करण्यात आली आहे.