सातारा जिल्हाहोम

कराडमध्ये सुसज्ज शिक्षक भवन उभारणार – डॉ. अतुल भोसले

शिक्षकदिन सोहळ्यात कराड दक्षिणमधील शिक्षकांचा सन्मान

कराड/प्रतिनिधी : – 

कराड हे शिक्षणाचे दुसरे माहेरघर आहे. कराडमध्ये शैक्षणिक विकासाला अधिक चालना मिळावी आणि शिक्षकांसाठी एक हक्काची जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने येत्या काळात कराडमध्ये सुसज्ज शिक्षक भवन उभारणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केले.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनमध्ये आयोजित शिक्षकदिन सोहळ्यात ते बोलत होते. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) जन्मशताब्दी वर्ष समिती आणि कृष्णा शिक्षक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षकदिन सोहळ्यात डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिणमधील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष सचिन नलवडे, सेवाज्येष्ठ शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश खोचीकर, माजी शिक्षणाधिकारी भानुदास हुलवान, कराड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, सचिन पवार, कराड – पाटण तालुका शिक्षक सोसायटीच्या संचालिका नीलम नायकवडी, शिक्षक संघाचे सरचिटणीस संभाजी यादव, कराड – पाटण तालुका शिक्षक संघाचे माजी चेअरमन दिलीप जाधव, मुकुंद पन्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, शिक्षक हे समाजातील पिढी घडवित असतात. समाजाला चांगली दिशा देण्याचे काम खऱ्या अर्थाने शिक्षक करतात. त्यांच्या कार्याला व्यापक स्तरावर पाठबळ मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. शिक्षकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची माझी इच्छा असून, कराडमध्ये येत्या काळात सुसज्ज शिक्षक भवन उभारण्याचा माझा मानस आहे. जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची लवकरच भेट घडवून आणण्यासाठीही माझे विशेष प्रयत्न राहतील.

कृष्णा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष सतीश चव्हाण यांनी प्रास्तविक केले. प्राचार्य डॉ. सी. बी. साळुंखे यांनी आभार मानले. याप्रसंगी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रधान सल्लागार प्रा. डॉ. विनोद बाबर, बी. एन. थोरात, जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या प्राचार्या डॉ. वर्षा देशपांडे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त हणमंत देशमुख, डॉ. अनंतकुमार गुजर, राजाराम मोहिते, अशोक सोमदे, तानाजी पवार, अमरजीत पुजारी, संतोष माळी, आमीनुद्दीन शेख यांच्यासह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles