आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची कृषी नवकल्पनेत उल्लेखनीय कामगिरी

कराड / प्रतिनिधी : –

कराड येथील कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थी वंश शाह व राजवीर खबाले यांनी विकसित केलेल्या ‘ॲग्रीएक्स – स्मार्ट शेती, उज्ज्वल भविष्य’ या नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्पाने सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) प्रादेशिक स्तरावरील प्रात्यक्षिक सादरीकरणासाठी मानाची निवड मिळवली आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहल निकुंभ यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या या प्रकल्पाचे नुकतेच नाशिक येथे आयोजित प्रादेशिक प्रात्यक्षिकात सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत प्रभावी सादरीकरण करण्यात आले. शेतकरी, व्यापारी आणि धान्य साठवणूक केंद्रांना एकाच डिजिटल माध्यमातून जोडून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव, सुरक्षित साठवणूक तसेच पारदर्शक व्यवहार उपलब्ध करून देण्याची या प्रकल्पाची संकल्पना परीक्षक आणि उपस्थित मान्यवरांच्या विशेष पसंतीस उतरली.

या उल्लेखनीय यशामागे मुख्याध्यापिका सौ. स्नेहल निकुंभ यांचे प्रेरणादायी नेतृत्व, शाळेतील शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन तसेच मार्गदर्शक शिक्षक निलेश सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला योग्य दिशा मिळाल्यामुळे हा प्रकल्प जिल्हास्तरावर अव्वल ठरला आणि प्रादेशिक स्तरावरही कराड व सातारा जिल्ह्याचा गौरव वाढविण्यात यशस्वी झाला.

या यशानंतर कराड शहर व परिसरातून विद्यार्थी वंश शाह, राजवीर खबाले, मुख्याध्यापिका सौ. स्नेहल निकुंभ तसेच मार्गदर्शक निलेश सर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पालक आणि विविध सामाजिक स्तरांतून त्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांचे व उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करण्यात येत असून, या यशामुळे कराडच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Related Articles