सातारा जिल्हाहोम

पार्लेत १ कोटी ६ लाखांच्या विकासकामांना प्रारंभ

आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते भूमिपूजन; शेती, सिंचन, रस्ते व मंदिर विकासाला प्राधान्य

कराड/प्रतिनिधी : –

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील पार्ले गावाच्या विकासाला चालना देणाऱ्या तब्बल १ कोटी ६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार मनोज घोरपडे आणि सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार धैर्यशील कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

या निधीतून मृद व जलसंधारण विभागाच्या कामांसाठी ४३ लाख रुपये, लघु पाटबंधारे विभागासाठी १५ लाख रुपये, ज्योतिर्लिंग मंदिर सभामंडपासाठी १० लाख रुपये, रस्ता काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉकसाठी ३० लाख रुपये, तसेच गोपाळनगर येथील लक्ष्मी मंदिरासमोरील काँक्रीटीकरणासाठी ८ लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत.या विकासकामांमुळे गावातील मूलभूत सुविधांना बळकटी मिळणार असून, शेती, सिंचन, रस्ते आणि धार्मिक स्थळांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

यावेळी बोलताना आमदार मनोज घोरपडे म्हणाले, कराड उत्तर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेती, पाणी, रस्ते आणि मंदिर विकासासारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत गावांचा सर्वांगीण कायापालट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आमदार धैर्यशील कदम यांनी, विकासकामांना शुभेच्छा देत भविष्यातही शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमास कोयना दूध संघाचे चेअरमन बाबुराव धोकटे, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती उपसभापती अनिताताई वेताळ, हिंदकेसरी पै. संतोष वेताळ, पंचायत समिती सदस्य प्रियंकाताई पळसे, माधवी पाटसुपे, सीमा घार्गे, सरपंच अश्विनी मदने, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles