कर्जमाफीबद्दल मुंबईत मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांकडून भव्य सत्कार
प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सोहळा

कराड/प्रतिनिधी : –
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी कर्जमाफी योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भव्य सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री अशोक उईके, भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे, भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ तसेच भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या कृषी कर्जमाफीची घोषणा केली. या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हा गौरव वैयक्तिक नसून संपूर्ण मंत्रिमंडळाचा असल्याचे सांगितले. या निमित्ताने राज्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी शेतकरी हितासाठी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीजपुरवठ्याची योजना यापुढेही कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. नवीन वीजजोडणी प्रक्रियेत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही, तसेच भविष्यात शेतीसाठी दिवसा १२ तास वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेने शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री दत्तात्रय भरणे यांनी, आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांना भविष्यात देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी भावना व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शेतकरीहिताच्या निर्णयांचे उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी किसान मोर्चा सातत्याने कार्यरत राहील. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटना कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शेतकरी व किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राज्यातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणींमुळे संकटात सापडले होते. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार असून नव्या उमेदीने शेती हंगामाला सुरुवात करण्याचे बळ मिळेल. ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरेल.
– रामकृष्ण वेताळ (प्रदेशाध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा)


