सातारा जिल्हाहोम

कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध – डॉ. संग्राम धुमाळ

यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्तीनिमित्त सत्कार

कराड/प्रतिनिधी : – 

यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालय, कराडच्या सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्यपदी डॉ. संग्राम धुमाळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल कराडमधील यशवंतप्रेमी शेतकरी आणि शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या समारंभात कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह प्रगतशील शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

कार्यक्रमात सातारा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव काशिनाथ पाटील, शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हा परिषद सदस्या सुनंदा पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीशराव इंगवले, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, आरपीआयचे सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड, तसेच महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. शिवाजीराव पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्रकाश पाटील यांनी, शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची भूमिका, महाविद्यालयाची वाटचाल आणि डॉ. धुमाळ यांचे संशोधन, अध्यापन व प्रशासकीय योगदान अधोरेखित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय नवे शैक्षणिक आणि कृषी विकासाचे मानदंड निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नामदेव पाटील यांनी, महाविद्यालयाने शेतकऱ्यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व अभ्यासवर्ग नियमितपणे आयोजित करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सचिन नलवडे यांनी, शेतमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयाने तांत्रिक मार्गदर्शनाची भूमिका अधिक सक्षमपणे बजावावी, असे मत मांडले. सुनंदा पाटील यांनी, महाविद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे आल्यास त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

संस्थापक प्राचार्य डॉ. शिवाजीराव पाटील यांनी, यशवंतराव चव्हाण यांच्या कृषी शिक्षणाविषयीच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या विकासाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. संग्राम धुमाळ यांनी, ‘उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ’ या तत्त्वावर कार्य करत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आधुनिक संशोधन आणि कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास महाविद्यालय कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली. सर्वांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण शासकीय कृषी महाविद्यालयाला राज्यातील अग्रगण्य शासकीय कृषी महाविद्यालय म्हणून विकसित करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

समारंभास तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, कृषी क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कृषीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles