इनर व्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी वैशाली पालकर
३७ वा पदग्रहण समारंभ; सेवाभावी उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार

कराड/प्रतिनिधी : –
इनर व्हील क्लब ऑफ कराडच्या ३७ व्या पदग्रहण समारंभात वैशाली पालकर यांनी २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत समाजसेवेचा नवा संकल्प व्यक्त केला. पंकज पी.सी. हॉल येथे झालेला हा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
समारंभाच्या प्रमुख पाहुण्या सौ. रश्मी सुभाष एरम यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करत सेवाभावी कार्याची परंपरा अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले. इनर व्हीलच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत त्यांनी संघटितपणे समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली.
यावेळी नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी श्रावणी घळसासी, सचिवपदी नम्रता कंटक, खजिनदारपदी राजश्री रामदुर्गकर, आयएसओपदी वैष्णवी कुंभार, संपादकपदी सीमा पुरोहित, सीसीपदी मेघा कोकणे, तर माजी अध्यक्षा अदिती पावसकर यांनी आयपीपी म्हणून जबाबदारी स्वीकारली. कार्यकारिणीत चार्टर प्रेसिडेंट रेखा काशीद यांच्यासह अंजली नावडीकर, सुजाता बेंद्रे, अनघा बर्डे आणि माधवी देसाई यांचा समावेश आहे.
निवृत्त अध्यक्षा अदिती पावसकर यांनी मागील वर्षभरात राबविण्यात आलेल्या समाजोपयोगी उपक्रमांचा आढावा घेत सर्व सदस्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा बर्डे आणि रुपाली डांगे यांनी केले, तर उपाध्यक्ष श्रावणी घळसासी यांनी उपस्थित मान्यवर, सदस्य आणि सहकार्यकर्त्यांचे आभार मानले.


