सातारा जिल्हाहोम

कराड दक्षिणच्या बंधाऱ्यांना निधीचा दिलासा

डॉ. अतुल भोसलेंच्या मागणीनंतर पालकमंत्र्यांचे तातडीच्या कार्यवाहीचे आदेश

कराड/प्रतिनिधी : – 

कराड दक्षिण मतदारसंघातील लघु पाटबंधारे योजनांच्या रखडलेल्या दुरुस्ती व देखभालीच्या कामांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. त्यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिल्याने रखडलेल्या कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, धैर्यशील मोहिते-पाटील, नितीन पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना आमदार डॉ. भोसले म्हणाले, सन २०२५-२६ मध्ये १०१ ते २५० हेक्टर क्षेत्राच्या लघु पाटबंधारे योजनांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. परिणामी उंडाळे परिसरातील अनेक बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे रखडली असून, टाळगाव, येणपे, मनवसह परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. या बंधाऱ्यांमुळे मोठ्या क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत असल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करून प्रलंबित कामे तातडीने सुरू करावीत, अशी त्यांनी आग्रही मागणी केली.

याचवेळी त्यांनी लघु पाटबंधारे तलावांवरील विद्युत मोटारी जोडण्याचा प्रश्नही उपस्थित केला. संबंधित आदेश अद्याप निघाले नसल्यामुळे नांदगाव, मनव, उंडाळे आणि घोगाव परिसरातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आवश्यक आदेश तातडीने निर्गमित करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिली.

कराड दक्षिणमधील सिंचन सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्याने या बैठकीत आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, लघु पाटबंधारे योजनांच्या कामांना लवकरच चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles