मलकापूरातील सेवा रस्ते आणि गटरांच्या दुरुस्तीबाबत उपाययोजना करण्याची मागणी

कराड/प्रतिनिधी : –
मलकापूर शहरातून जाणाऱ्या एशियन हायवे-४७ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४) वरील सेवा रस्ते आणि गटरांची झालेली दुरवस्था तातडीने दूर करावी, अशी मागणी मलकापूर नगरपालिकेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सेवा रस्त्यांवर पाणी साचून नागरिक, व्यापारी, तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने याबाबत उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या उपस्थितीत प्रकल्प संचालकांना निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, मलकापूर नगरपालिका हद्दीतील हॉटेल संगम ते नांदलापूर गावाच्या हद्दीपर्यंत उभारण्यात आलेला उड्डाणपूल अंतिम टप्प्यात असून, तो लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. शहरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात आला असला तरी स्थानिक नागरिकांसाठी आणि उंडाळे-ढेबेवाडी खोऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सेवा रस्त्यांची अवस्था चिंताजनक बनली आहे.
महामार्ग प्रकल्प अहवालानुसार या संपूर्ण परिसरात सेवा रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना आरसीसी गटर उभारण्याची तरतूद आहे. नव्याने काही ठिकाणी गटर बांधण्यात आले असले तरी जुन्या सेवा रस्त्यालगतची गटारे मोडकळीस आली आहेत. अनेक ठिकाणी गटरवरील झाकणे निखळली असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. परिणामी पावसाचे पाणी गटरमध्ये न जाता थेट सेवा रस्त्यांवर साचत आहे. सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे ही समस्या अधिक तीव्र झाली असून आगामी मान्सूनमध्ये परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्यालगतच्या रहिवाशांना आणि व्यावसायिकांना पावसाच्या पाण्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच सेवा रस्त्यांची खराब अवस्था लक्षात घेता अपघाताचा धोका वाढल्याचीही पालिकेने निदर्शनास आणून दिले आहे.
१५ जूनपासून शाळा व महाविद्यालये सुरू होत असल्याने कराड, विद्यानगरी-सैदापूर आणि परिसरात शिक्षणासाठी जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सेवा रस्ते तातडीने दुरुस्त करून वाहतुकीयोग्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मलकापूर नगरपालिकेने यापूर्वीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर कार्यालयाशी अनेकदा पत्रव्यवहार केला असून, विविध बैठकींतून पाठपुरावा करण्यात आला आहे. आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही या कामांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. मंगळवारी (दि. ९) मलकापूर शहरातील महामार्गाच्या दुरावस्थेबाबत आणि मान्सूनपूर्व करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात प्रकल्प संचालक संजय कदम यांना नगरपालिकेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नियोजन सभापती सुरज शेवाळे, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण व वैद्यक सभापती धनंजय येडगे, नगरसेवक प्रमोद शिंदे, सुनिल खैरे, आरोग्य विभाग प्रमुख धनंजय थोरात, तसेच नागरिक उपस्थित होते.


