सातारा जिल्हाहोम

कराडमध्ये चॉकलेट वाटप करत काँग्रेसकडून इंधन दरवाढीचा निषेध

युवक काँग्रेसचे पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन; केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका, दरकपातीची मागणी

कराड/प्रतिनिधी : –

वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने गुरुवारी कराडमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल पंपावर वाहनधारकांना ‘मेलोडी’ चॉकलेटचे वाटप करून ‘मेलोडी इतकी चॉकलेटी का आहे?’ या प्रसिद्ध जाहिरातीतील वाक्याचा संदर्भ घेत महागाईमुळे सामान्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली कडवट परिस्थिती आंदोलनातून अधोरेखित करण्यात आली.

इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत असून, महागाईने जनतेचे जगणे कठीण केले आहे. केंद्र सरकारने तातडीने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच केंद्राच्या धोरणांमुळे वाहतूक, शेती आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याचा आरोपही करण्यात आला.

या आंदोलनात सौ. सत्त्वशीला पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नूतन सातारा जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, युवक काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस अमित जाधव, तालुकाध्यक्ष देवदास माने, समीर इनामदार, उदय जाधव, संग्राम पवार, रविंद्र बडेककर, प्रविण वेताळ, चैतन्य पाटील, दिग्विजय जमाले, शहानूर देसाई, उमर फारूक, खालीद पटेल, रविराज पाटील यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles