सातारा जिल्हाहोम

दहावीच्या निकालात चाटे शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांचे यश 

कराड-मलकापूर शाखेतील विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी; गुणवंतांचा सत्कार, पालक-शिक्षकांचा गौरव

कराड/प्रतिनिधी : – 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत चाटे शिक्षण समूहाच्या कराड व मलकापूर शाखेतील विद्यार्थ्यांनी यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली.

निकाल जाहीर होताच चाटे क्लासेस तसेच चाटे आयआयटी-नीट अकॅडमीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

समारंभाला चाटे शिक्षण समूहाचे कराड शाखा व्यवस्थापक व संचालक प्रा. रमेश बनकर प्रमुख उपस्थित होते. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष गोपीचंद चाटे यांनी दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रा. रमेश बनकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यामध्ये शर्वरी गोरे हिने ९८.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मृणाल पाटील (९८.२०), स्वरा पाटील (९७.२०), सारा नदाफ (९७.००), आकांक्षा नाईकवाडी (९६.२०), प्रतीक सपकाळ (९५.६०), ऋतुजा यादव (९५.००), राजेश्वरी जगताप व यश पवार (९४.६०), श्वेता चौरे (९४.४०), मनीष पाटील व तनिष्का पाटील (९४.००) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.

यावेळी वर्षभर विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. अनेक पालकांनी ‘चाटे पॅटर्न’मुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा व आत्मविश्वास मिळाल्याची भावना व्यक्त केली.

प्रा. रमेश बनकर यांनी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दहावीनंतरच्या करिअर नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. दहावी हा शेवट नसून उज्ज्वल भविष्याची सुरुवात आहे. अकरावी-बारावीसोबतच जेईई, नीट, सीईटी, एनडीए यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी वेळेवर सुरू करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी मित्र किंवा नातेवाईकांच्या दबावाखाली न जाता स्वतःच्या आवडी, क्षमता आणि ध्येय ओळखून करिअरची दिशा ठरवावी, असा सल्लाही त्यांनी दिला. सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

Related Articles