सातारा जिल्हाहोम

साखरेचे दर वाढल्यावर उसाला भाववाढ का मिळत नाही? – अशोकराव थोरात

साखर ७० रुपयांवर; गतहंगामातील उसाला एफआरपीपेक्षा ७०० ते ९०० रुपये अधिक दर देण्याची मागणी

कराड/प्रतिनिधी : –

साखरेच्या बाजारभावात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असताना या दरवाढीचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना का मिळत नाही, असा सवाल शेती मित्र अशोकराव थोरात यांनी उपस्थित केला आहे. गतहंगामात कारखान्यांना ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा ७०० ते ९०० रुपये अधिक दर दसरा-दिवाळीपूर्वी द्यावा, अशी मागणी त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

गेल्या तीन-चार महिन्यांत साखरेच्या घाऊक व किरकोळ दरात सातत्याने वाढ झाली असून, साखरेचा दर ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचा दावा थोरात यांनी केला. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांत साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना अपेक्षित वाढीव दर दिलेला नाही. त्यामुळे “साखरेला चांगला भाव, मग उसाच्या दराला लगाम का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ऊसापासून साखरेबरोबरच इथेनॉल, स्पिरिट, मद्य तसेच वीज यांसारखे उपपदार्थ तयार होतात. या उत्पादनांच्या बाजारभावातही वाढ होत असताना त्याचा लाभ ऊस उत्पादकांना मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

गतहंगामातील साखरेच्या वाढलेल्या बाजारभावामुळे कारखान्यांना होणाऱ्या अतिरिक्त फायद्यात शेतकऱ्यांचा वाटा असावा, अशी मागणी थोरात यांनी केली. प्रत्येक सहकारी व खासगी कारखान्याने गोदामात गतहंगामातील किती साखर शिल्लक आहे, तसेच गेल्या वर्षभरात महिनानिहाय किती साखर कोणत्या दराने विकली, याची माहिती ऊस उत्पादक व सभासदांसमोर जाहीर करावी, असे त्यांनी म्हटले आहे. गतहंगामातील साखर आज वाढीव दराने विकली जात असेल, तर त्या अतिरिक्त उत्पन्नातील काही हिस्सा शेतकऱ्यांना देणार का? असा सवाल त्यांनी कारखाना व्यवस्थापनाला केला.

साखरेच्या एकूण उत्पादनापैकी केवळ ३० ते ३५ टक्के साखर घरगुती वापरासाठी लागते, तर उर्वरित साखरेचा वापर मिठाई, शीतपेये, बेकरी आणि औद्योगिक क्षेत्रात होतो. साखरेच्या दरवाढीवर महागाईची चर्चा होत असताना, खत, औषधे, मजुरी, पाणी व वाहतूक यांसह ऊस उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे थोरात यांनी सांगितले. साखरेचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकारने १० लाख मेट्रिक टन साखर आयात करण्याची घोषणा केल्याचाही त्यांनी उल्लेख केला. अशा निर्णयांचा परिणाम ऊस उत्पादकांच्या उत्पन्नावर होऊ नये, यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

साखरेच्या वाढलेल्या बाजारभावाचा फायदा शेतकऱ्यांना देणे शक्य असल्याचे सांगत थोरात यांनी एफआरपीपेक्षा ७०० ते ९०० रुपये अधिक दर देण्याची मागणी केली. हा दर देणे शक्य नसल्यास कारखान्यांच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने शेतकऱ्यांशी समक्ष चर्चा करून साखरेच्या वाढीव दरातून मिळणारे उत्पन्न कुठे जाते, याचा खुलासा करावा, असे आव्हान त्यांनी दिले. राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांनी या प्रश्नात हस्तक्षेप करून साखरेच्या वाढलेल्या दराचा योग्य लाभ ऊस उत्पादकांना मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, वाढलेल्या साखर दराच्या तुलनेत उसाला वाढीव भाव मिळावा, यासाठी गावागावांत चर्चा सुरू असून मागणी मान्य न झाल्यास शेतकऱ्यांची तरुण पिढी आंदोलन उभारू शकते, असा इशाराही थोरात यांनी दिला आहे.

Related Articles