भटक्या श्वानांवर कराड नगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात – विजय वाटेगावकर
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, लसीकरण, निर्बिजीकरणासह आक्रमक श्वानांसाठी निवारा केंद्र उभारण्याची मागणी

कराड/प्रतिनिधी : –
शहरातील वाढत्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, नगरपालिकेने यावर तातडीने शास्त्रोक्त व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपचे नगरपालिका गटनेते विजय वाटेगावकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. शहरातील विविध भागांत भटक्या श्वानांची संख्या वाढली असून, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी श्वानांकडून नागरिकांचा पाठलाग, हल्ला व चावा घेण्याच्या घटना घडत असल्याने या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे वाटेगावकर यांनी म्हटले आहे.
कराड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या श्वानांचे लसीकरण व निर्बिजीकरण करण्याचा विषय मंजूर झाला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे मंजूर विषयाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. सर्व भटक्या श्वानांचे टप्प्याटप्प्याने प्राणी जन्म नियंत्रण (ABC) अंतर्गत शास्त्रोक्त निर्बिजीकरण करून रेबीज प्रतिबंधक लसीकरण करावे. लसीकरण व निर्बिजीकरण झालेल्या श्वानांचे मार्किंग करून प्रभागनिहाय नोंद ठेवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
नागरिकांच्या तक्रारींच्या आधारे आक्रमक व सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या श्वानांची स्वतंत्र नोंद तयार करून त्यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार कार्यवाही करावी. तसेच अशा आक्रमक श्वानांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र उभारावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. या कामासाठी आवश्यक असल्यास मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय संस्था अथवा डॉक्टरांची नियुक्ती करावी. तसेच अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, निविदा व कार्यादेशाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार नोंदणी व कार्यवाही यंत्रणाही सुरू करावी, असे वाटेगावकर यांनी सुचविले आहे.
तसेच नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची या विषयाला मान्यता मिळालेली असल्याने विलंब न करता भटक्या श्वानांचे लसीकरण, निर्बिजीकरण आणि आक्रमक श्वानांसाठी निवारा केंद्र उभारण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी आग्रही मागणी विजय वाटेगावकर यांनी केली आहे.


