नगरसेवक आपल्या दारी उपक्रमांतून नागरिकांचे प्रश्न सोडवणार – तेजश्री पाटसकर
प्रत्यक्ष भेटीत पाणी, स्वच्छतेपासून शासकीय योजनांपर्यंत मार्गदर्शन

कराड/प्रतिनिधी : –
कराड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आलेल्या नगरसेविका सौ. तेजश्री सुदर्शन पाटसकर यांनी ‘नगरसेवक आपल्या दारी’ या उपक्रमातून नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने प्रभागातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून ते सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची माहिती कराड येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी जेष्ठ नेते विष्णू पाटसकर, भाजपचे पदाधिकारी सुदर्शन पाटसकर व नगरसेविका सौ. तेजश्री पाटसकर उपस्थित होते.
याप्रसंगी निवडणुकीत नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करताना पाटसकर म्हणाल्या की, मतदारांनी दिलेला कौल ही मोठी जबाबदारी आहे. केवळ निवडणुकीपुरता नागरिकांशी संपर्क न ठेवता त्यांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष काम करणे, हे आपले कर्तव्य आहे. ‘नगरसेवक आपल्या दारी’ या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, गटार, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन व स्वच्छता या मूलभूत प्रश्नांबरोबरच महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
पात्र नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देणार‘प्रभाग विकास + योजना लाभ’ या संकल्पनेनुसार प्रभाग योजना मार्गदर्शन, महिला योजना नोंदणी, ज्येष्ठ नागरिक योजना, आरोग्य तपासणी व आयुष्यमान कार्ड मार्गदर्शन, पीएम स्वनिधी व स्वयंरोजगार तसेच युवकांसाठी कौशल्य विकास शिबिरे राबविण्याचा मानस असल्याचे पाटसकर यांनी सांगितले. प्रभागातील एकही पात्र नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक मार्गदर्शन व मदत करण्यात येईल. नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या सूचना, अपेक्षा आणि समस्या समजून घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगरसेवकाची जबाबदारी केवळ रस्ते, गटारे आणि पथदिव्यांपुरती मर्यादित नसून, शासनाच्या विविध योजना पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविणे हीदेखील लोकसेवाच आहे, अशी भूमिका पाटसकर यांनी मांडली. प्रभागाचा सर्वांगीण विकास, सुरक्षित व स्वच्छ वातावरण आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत पुढील काळात प्रत्येक कुटुंबाच्या विकासाचा विचार करून नियोजन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभागातील नागरिकांनी आपल्या समस्या व सूचना मोकळेपणाने मांडाव्यात. त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी निश्चितपणे पार पाडू. नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार असल्याचे पाटसकर यांनी सांगितले. नागरिकांसाठी उपयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबतही सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


