सातारा जिल्हाहोम

मराठा उद्योजकांना व्याज परतावा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – नरेंद्र पाटील 

कराड/प्रतिनिधी : –

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजातील युवकांना उद्योग-व्यवसायासाठी मिळणाऱ्या कर्ज योजनेला अधिक बळ देण्यासाठी महामंडळाला आणखी ८०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. तसेच महामंडळाकडून कर्ज घेतलेल्या राज्यातील सुमारे १ लाख ८४ हजार मराठा उद्योजकांना व्याज परतावा वेळेवर मिळावा, यासाठीही मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.

कराडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी, महामंडळाच्या कामकाजासह मराठा समाजातील उद्योजकांसमोरील विविध प्रश्नांवर भाष्य केले. ते म्हणाले, राज्य सरकारकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्याचे चांगले काम सुरू आहे. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे, तसेच काही चुकीच्या निर्णयांमुळे लाभार्थी युवकांना अडचणींचा सामना करावा लागला.

महामंडळाअंतर्गत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळणे, हा महत्त्वाचा विषय आहे. राज्यात सुमारे १ लाख ८४ हजार मराठा उद्योजक या योजनेचा लाभ घेत आहेत. सातारा जिल्ह्यातही सुमारे ११ हजार ८०० लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना व्याज परतावा वेळेत मिळण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच भेट घेऊन व्याज परताव्याचा प्रश्न मांडणार असून, महामंडळाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता अतिरिक्त ८०० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणीही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजातील युवकांनी उद्योजक व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यां ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंमलबजावणीत गेल्या काही महिन्यांत काही अडथळे निर्माण झाले होते. मात्र, आता ते दूर करण्यात आले असून, महामंडळाच्या नवीन व्यवस्थापकीय संचालकांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाला गती मिळाली आहे. मागील व्यवस्थापकीय संचालकांनी घेतलेले अनेक बेकायदेशीर निर्णय रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी कमी होत असून, महामंडळाची कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरही पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाचे पाय धरले किंवा लोटांगण घातले तरी त्यांना माफ केले जाणार नाही. त्यांनी वापरलेले शब्द मागे घेता येणार नाहीत. समाजातील महिलांविषयी अशा प्रकारची वक्तव्ये सहन केली जाणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेचा राज्यभरातील सुमारे १ लाख ८४ हजार मराठा उद्योजक लाभ घेत आहेत. त्यापैकी सातारा जिल्ह्यात सुमारे ११ हजार ८०० लाभार्थी आहेत. व्याज परतावा वेळेत मिळावा, यासाठी महामंडळाकडून पाठपुरावा केला जाणार आहे.

२०२४ मध्ये प्रमाणपत्र घेतलेल्या लाभार्थ्यांसह २०२५ मधील लाभार्थ्यांच्या बाबतीत, तसेच एलव्हायमध्ये निर्माण करण्यात आलेल्या काही अटी व शर्तींमुळे युवकांना अडचणी येत आहेत. या अटी-शर्ती लवकरच शिथिल करण्यात येतील, अशी माहितीही नरेंद्र पाटील यांनी दिली. यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या मराठा समाजातील युवकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक युवकांनी स्वावलंबी व्हावे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Related Articles