बाल आनंद अॅक्टिव्हिटी स्पर्धेतील ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कराड/प्रतिनिधी : –
बालवयात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना आणि कौशल्यांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी चालना मिळते. स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, विचारक्षमता, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते, असे प्रतिपादन हायवे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज बाबर यांनी केले.
शिक्षणतज्ज्ञ शाहीर आत्माराम यादव पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बाल आनंद अॅक्टिव्हिटी स्पर्धा परीक्षे’च्या गुणवत्ता यादीतील ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी पोलीस निरीक्षक मनोज बाबर आणि कराड शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
सपोनि संदीप साळुंखे म्हणाले, अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतांची ओळख होते. आजच्या सत्कारामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. या यशामध्ये शिक्षक आणि पालकांचे योगदानही महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमास शिक्षणतज्ज्ञ शाहीर आत्माराम यादव शैक्षणिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोळी, पीएम श्री कराड नगरपरिषद शाळा क्रमांक ३ चे मुख्याध्यापक सुहास आलेकरी, पर्यवेक्षक संग्राम गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्याध्यापिका शुभांगी भस्मे, पर्यवेक्षिका रुपाली शिंदे, हेमा यादव, मनिषा पाटील, विद्या स्वामी, अपर्णा बुधे, दैवशाला पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक, तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


