कराड अर्बन सेवक पतसंस्थेचा १४ टक्के लाभांशाचा ठराव एकमताने मंजूर
संस्थेचा एनपीए शून्य टक्के

कराड/प्रतिनिधी : –
दि कराड अर्बन सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, कराडची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. २०) शताब्दी सभागृहात उत्साहात पार पडली. संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना सभासदसंख्या, ठेवी, कर्जवाटप आणि नफ्यात झालेली वाढ अधोरेखित करण्यात आली. यावेळी सभासदांसाठी प्रस्तावित करण्यात आलेला १४ टक्के लाभांशाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सलीम नुरंमहमद शेख होते. दि कराड अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शशांक पालकर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, संचालक श्रीरंग ज्ञानसागर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पतसंस्थेचे मार्गदर्शक सीए धनंजय शिंगटे यांच्यासह अर्बन परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे सचिव किरण हणमंत मोटे यांनी, प्रास्ताविक करून सभेच्या नोटीसचे वाचन केले. त्यानंतर अध्यक्ष सलीम शेख यांनी, संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा मांडला. गेल्या १६ वर्षांत अर्बन परिवारातील विविध संस्थांमधील सेवकांच्या आर्थिक उन्नतीसाठी पतसंस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली, असे त्यांनी सांगितले. आर्थिक वर्षअखेरीस संस्थेची सभासदसंख्या ९९२, भागभांडवल २ कोटी ५ लाख रुपये, ठेवी १४ कोटी ३७ लाख रुपये, कर्ज ८ कोटी ६५ लाख रुपये, गुंतवणूक ९ कोटी ६ लाख रुपये, राखीव व इतर निधी १ कोटी २९ लाख रुपये, तर निव्वळ नफा ३ कोटी ८५ लाख रुपये इतका असल्याची माहिती सभेत देण्यात आली. संस्थेला सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ‘अ’ वर्ग लेखापरीक्षण दर्जा मिळाला असून, संस्थेचा एनपीए शून्य टक्के राहिला आहे. ही संस्थेच्या आर्थिक शिस्तीची आणि सक्षम व्यवस्थापनाची पावती असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष अतुल शिंदे यांनी, नफा वाटणीचा ठराव सभेसमोर मांडताना १४ टक्के लाभांश देण्याचा प्रस्ताव ठेवला. उपस्थित सभासदांनी हा ठराव एकमताने मंजूर केला. संस्थेच्या प्रगतीमध्ये अर्बन परिवाराचे प्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, विद्यमान अध्यक्ष समीर जोशी, उपाध्यक्ष शशांक पालकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीए धनंजय शिंगटे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगण्यात आले. संस्थेच्या यशामध्ये सभासद, संचालक मंडळ आणि सेवक वर्गाच्या योगदानाचे महत्त्व असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
सभेस संचालक गिरीश सिहासने, संदीप पवार, राजेंद्र कांबळे, प्रदीप कदम, प्रशांत दळवी, अमर भोकरे, व्यवस्थापिका सबिना इनामदार आदी उपस्थित होते. प्रशांत दळवी यांनी आभार मानले.



