कराड अर्बन बँकेचा CKYC २.० बदलांसाठी ‘ऑपरेशन भरोसा’ मास्टरक्लास
५० हून अधिक नागरी सहकारी बँकांतील १०० प्रतिनिधींचा सहभाग; सागर तन्ना यांचे मार्गदर्शन

कराड/प्रतिनिधी : –
बँकिंग क्षेत्रात लवकरच लागू होणाऱ्या CKYC २.० मधील महत्त्वपूर्ण बदलांना सामोरे जाण्यासाठी बँकिंग क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्ययावत माहिती मिळावी, या उद्देशाने दि कराड अर्बन को-ऑप बँक लि., कराड आणि ट्रॅकव्हीझ (टी.एस.एस. कन्सल्टन्सी प्रा. लि., मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑपरेशन भरोसा’ या विशेष मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (दि. १४) झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमास सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर व पुणे जिल्ह्यांतील ५० हून अधिक नागरी सहकारी बँकांमधील १०० पेक्षा अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
ट्रॅकव्हीझचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर तन्ना यांनी CKYC २.० मध्ये होणारे बदल, त्यासाठी बँकांनी करावयाची पूर्वतयारी, तसेच अंमलबजावणीच्या प्रक्रियेत घ्यावयाची दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून बदलांची माहिती दिल्याने प्रशिक्षणार्थींना आगामी प्रणाली समजून घेण्यास मदत झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष समीर जोशी आणि उपाध्यक्ष शशांक पालकर यांनी, सागर तन्ना यांचे स्वागत व सत्कार केला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी, प्रास्ताविकात KYC-AML विषयक प्रशिक्षणाची गरज अधोरेखित करत भविष्यातही अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे सांगितले.
कराड अर्बन बँकेचे उपमहाव्यवस्थापक सीएस. अमित रेठरेकर यांनी, प्रशिक्षणार्थींच्या विविध शंकांचे निरसन केले. CKYC २.० च्या अंमलबजावणीपूर्वी आवश्यक नियोजन, प्रक्रिया आणि अनुपालनाबाबत या प्रशिक्षणातून सहभागी बँकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. महाव्यवस्थापक विकास खबाले यांनी केले, तर व्यवस्थापक अभिजित माने यांनी आभार मानले.
केंद्रीय KYC नोंदणी व्यवस्थेत होणाऱ्या आगामी बदलांच्या पार्श्वभूमीवर बँकिंग संस्थांना आपल्या KYC प्रक्रियेत आवश्यक सुधारणा व पूर्वतयारी करावी लागणार आहे. या बदलांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘ऑपरेशन भरोसा’ मास्टरक्लास उपयुक्त ठरला.


