सातारा जिल्हाहोम

उपेक्षितांच्या जगण्याला शब्द देणारे साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे – प्रा. अनंत निकम 

सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात

कराड/प्रतिनिधी : –

उपेक्षित, कष्टकरी आणि वंचितांच्या जगण्यातील दुःख, वेदना, संघर्ष आणि विद्रोहाला आपल्या लेखणीतून प्रभावी शब्दरूप देणारे साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आजही तितकेच समकालीन आहे. त्यांच्या साहित्यामागील जीवनानुभव, संघर्ष आणि विचार समजून घेतल्याशिवाय अण्णाभाऊंच्या लेखनाची प्रेरणा समजणार नाही, असे प्रतिपादन प्रा. अनंत निकम यांनी केले.

सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात प्रा. निकम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. रामचंद्र व्हनबट्टे होते.

अण्णाभाऊंचे अल्पशिक्षण, मुंबईतील जीवन, विविध सामाजिक चळवळींतील सहभाग, तसेच त्यांच्या साहित्यामधील संघर्षशील पात्रे आणि कष्टकरी जीवनाचे चित्रण यांचा प्रा. निकम यांनी परखडपणे वेध घेतला. अण्णाभाऊंच्या साहित्याची कालातीतता, सर्वसमावेशकता आणि साम्यवादी-मार्क्सवादी विचारांचा संदर्भ त्यांनी विद्यार्थ्यांसमोर सोप्या भाषेत मांडला. मराठी साहित्याला जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अण्णाभाऊंनी केले असून, त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा पुढे नेणे हे आजच्या पिढीचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात प्रा.डॉ. व्हनबट्टे यांनी, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असल्याचे नमूद केले. कष्टकरी आणि वंचितांच्या जगण्याचे वास्तव मांडणारे साहित्य विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे. वाचनातूनच लेखनाची प्रेरणा मिळते आणि त्यासाठी चिंतन व मनन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. डॉ. बाबासाहेब नाईक यांनी प्रास्ताविक केले. रविंद्र जाधव यांनी अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना गावाकडे राहिली’ या छक्कडीचे दमदार सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमास प्रा.डॉ. ए.के. पाटील, प्रा.डॉ. गिरीश कल्याणशेट्टी, प्रा.डॉ. बाबासाहेब नाईक, प्रा.डॉ. अभय पाटील, प्रा. सुहास गोडसे, प्रा. गौतम बनसोडे, प्रा.डॉ. कल्पना पाटील यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ. कोमल कुंदप यांनी केले. तर आभार प्रा.डॉ. प्राजक्ता निकम यांनी मानले.

Related Articles