महिला शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे – समताताई घोरपडे
पाडळीत ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’; महिला शेतकऱ्यांना कृषी किटचे वाटप
कराड/प्रतिनिधी : –
महिला शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेती क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन समताताई घोरपडे यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने
पाडळी, ता. सातारा येथील वृंदावन फार्मस् येथे ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक साधने, बियाणे व कृषीविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
महिला शेतकऱ्यांना शेतीच्या कामात हातभार लागावा आणि त्यांचा श्रम कमी व्हावा, या उद्देशाने ‘कृषी माऊली’ किटचे मोफत वाटप करण्यात आले. पर्यावरणपूरक कापडी पिशवीतून प्रगत भाजीपाला बियाणे, जैविक खते, खुरपे, विळा तसेच रात्रीच्या सुरक्षिततेसाठी टॉर्च अशा विविध साहित्याचा किटमध्ये समावेश होता.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले माती परीक्षणाचे थेट प्रात्यक्षिक. शेतातील मातीचा नमुना योग्य पद्धतीने कसा घ्यावा, मातीची सुपीकता कशी तपासावी आणि त्यानुसार पिकांची निवड व खत व्यवस्थापन कसे करावे, याबाबत महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. KVK, स्थानिक कृषी अधिकारी, तसेच कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून आणि सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा तेजस्विनीताई घोरपडे यांच्या प्रयत्नातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास नगरसेविका तथा उपाध्यक्षा हेमलताताई भोसले, जिल्हा सरचिटणीस सविताताई फाळके, कृषितज्ज्ञ ऋषिकेशनाना ढाणे, राजेंद्र ढाणे आबा, पी. वाय. ढाणेसर, डॉ. कल्याण बाबर, कृषीसहाय्यक अमित घोरपडे, संजय ढाणे, मानाजी ढाणे, दिलीप ढाणे बापू, दत्तात्रय ढाणे, सागरभैय्या ढाणे, जिल्हा सरचिटणीस अक्षयदादा भोसले, पायलताई जाधव, ज्योती ढाणे, संगिता ढाणे यांच्यासह भाजपा महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या.



