माजी सैनिकांच्या न्यायहक्कांसाठी तालुका स्तरावर विधी कक्षाची मागणी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून सकारात्मक प्रतिसाद; सचिव प्रियदर्शनी वाघमारे यांचा सैनिक फेडरेशनतर्फे सन्मान

कराड/प्रतिनिधी : –
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सोमवारी (दि. २९) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबीय व त्यांच्या वारसांसाठी विशेष मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सैनिक फेडरेशन (महाराष्ट्र राज्य) आणि माजी सैनिकांच्या वतीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती प्रियदर्शनी वाघमारे यांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
श्रीमती वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवीण बर्गे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीय तसेच शहीद जवानांच्या वारसांना कायदेशीर हक्क, दिवाणी न्यायालयातील प्रकरणे आणि मोफत विधी सहाय्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सैनिकांच्या विविध तक्रारी ऐकून त्या लेखी स्वरूपात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील विधी कक्षाकडे सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करून शक्य ती कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सैनिक फेडरेशनचे शासकीय सदस्य प्रशांत कदम यांनी, सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अनेक दिवाणी प्रकरणांचा निकाल वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधले. या प्रकरणांना विशेष प्राधान्य देऊन तातडीने निकाल द्यावेत, तसेच प्रत्येक तालुका न्यायालयात ‘सैनिक विधी न्याय कक्ष’ स्थापन करून तेथे माजी सैनिक विधिज्ञ वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली.या मागणीवर सकारात्मक चर्चा झाली असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयात दरमहा विधी जनजागृती व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन श्रीमती वाघमारे यांनी दिले.
या बैठकीस शंकर माळवदे, संजय लावंड, संजय निंबाळकर, प्रवीण शिंदे, आनंदराव शिंगाडे, रामचंद्र इंगळे, विनायक जंगम, यशवंत शिंदे, यशवंत इथापे, सर्जेराव देसाई यांच्यासह सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.



