आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

सातारा-सांगली विधानपरिषद निवडणूक: ‘महायुती’ विरुद्ध ‘मविआ’ चुरस !

आ.डॉ अतुल भोसले निर्णयमते भाजपसाठी जुळवणार !

कराड / विशेष प्रतिनिधी : –

सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी कमालीची रंगली असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत एकूण तीन उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट) उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही जिल्ह्यांतील बलाबल पाहता वरकरणी महायुतीचे पारडे जड वाटत असले, तरी अंतर्गत धुसफूस आणि ‘जिल्हा परिषद’ निवडणुकीच्या वादाची पार्श्वभूमी यामुळे ही लढत चुरशीची ठरणार आहे.

मतदानात साताऱ्याचे पारडे जड

सांगली-सातारा मतदारसंघामध्ये एकूण ८९५ मतदार आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील ४२३, तर सातारा जिल्ह्यातील तब्बल ४७२ मतदारांचा समावेश आहे. सांगलीच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात ४९ मतदार अधिक असल्याने साताऱ्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

पक्षनिहाय मतदारांची आकडेवारी:

भाजप: ३१४

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): २०५

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): ११९

शिवसेना (शिंदे गट): १११

काँग्रेस: ७३

शिवसेना (ठाकरे गट): ०१

याशिवाय अपक्ष मतदारांची संख्याही निवडणुकीत महत्त्वाची ठरेल.

‘झेडपी’ वादाची ठिणगी आणि अंतर्गत नाराजी

वरवर महायुती भक्कम दिसत असली, तरी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय नाट्याचे सावट या निवडणुकीवर स्पष्ट दिसत आहे. तत्कालीन झेडपी निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला दूर ठेवण्यासाठी डाव टाकला होता. मात्र, महायुतीचे मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे काही सदस्य फोडून भाजपचा अध्यक्ष बनवण्यात यश मिळवले होते. यावरून निर्माण झालेली कटुता शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) स्थानिक सदस्य अजूनही विसरलेले नाहीत.

या अंतर्गत वादाची पहिली ठिणगी धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज भरतानाच पडली होती. त्यावेळी महायुतीचे मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी अनुपस्थिती दर्शवत आपली नाराजी व्यक्त केली होती. जरी नंतर अपक्ष उमेदवार तानाजी पाटील यांनी माघार घेतली आणि देसाई-पाटील यांनी युतीधर्म पाळणार असल्याचे जाहीर केले असले, तरी अंतर्गत धुसफूस पूर्णपणे शमलेली नाही.

 

पाच मंत्र्यांनी लावली ‘फील्डिंग

महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप हे आर्थिकदृष्ट्या तगडे असल्याने, निवडणुकीत ऐनवेळी होणाऱ्या ‘अर्थकारणा’तून मतांची जुळवाजुळव बदलू शकते, अशी चर्चा स्थानिक पातळीवर आहे. आपला उमेदवार ‘डेन्जर झोन’मध्ये जाऊ नये म्हणून महायुतीच्या पाच प्रमुख मंत्र्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले आणि मकरंद पाटील यांनी स्वतः मैदानात उतरून ‘फील्डिंग’ लावली आहे.

 

अपेक्षित की अनपेक्षित निकाल?

स्थानिक राजकीय विश्लेषकांच्या मते, महायुतीमधील फोडाफोडी रोखण्यात हे पाच मंत्री यशस्वी ठरतात की ‘मविआ’ जिल्हा परिषदेच्या जुन्या वादाचा फायदा उठवून चमत्कार घडवते, यावरच भाजपच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. दोन्ही बाजूने गुप्त बैठका आणि व्यूहरचना आखल्या जात असल्याने, या निवडणुकीत कोणताही अनपेक्षित निकाल लागू शकतो. नेमका काय राजकीय चमत्कार घडणार, हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल.

 

 

  आ.डॉ अतुल भोसले निर्णयक मते भाजपसाठी जुळवणार !

 

सांगलीच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात ४९ मतदार अधिक असल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ अतुल भोसले निर्णयक मते भाजपसाठी जुळवणार ही निर्णयक मते भाजपचा विजय सुखकर करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे, साताऱ्याची भूमिका निर्णायक ठरणारल!

Related Articles