सातारा जिल्हाहोम

निराधार व निवृत्तीवेतनधारकांनी २५ जूनपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे – तहसीलदार कल्पना ढवळे

विलंब झाल्यास विशेष सहाय्य योजनांचा लाभ बंद होण्याची शक्यता 

कराड/प्रतिनिधी : – 

संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी विधवा, अपंग व वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनांसह विविध विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) तातडीने काढून २५ जून २०२६ पूर्वी सादर करावे, असे आवाहन तहसील कल्पना ढवळे यांनी केले आहे.

लाभार्थ्यांच्या हयातीची पडताळणी करण्यासाठी शासनाने विशेष मोहीम सुरू केली असून, ही प्रक्रिया ७ मे २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना मिळणारे निवृत्ती वेतन व इतर आर्थिक सहाय्य नियमित सुरू राहण्यासाठी ही पडताळणी वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हयातीचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना जवळच्या महा-ई-सेवा केंद्रातून मिळू शकते. तसेच शासनाच्या ‘बेनिफिशरी सत्यापन अॅप (BSA)’ च्या माध्यमातून घरबसल्या स्वतःची पडताळणी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांना या प्रक्रियेसाठी कार्यालयीन हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही.

या प्रक्रियेसाठी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. ५० वर्षांखालील सर्व लाभार्थ्यांनी अद्ययावत उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक असून, ५० वर्षांवरील लाभार्थ्यांनी दर पाच वर्षांनी उत्पन्नाचा दाखला नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

हयातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत तसेच उत्पन्नाच्या दाखल्याची प्रत तहसील कार्यालय, कराड येथे जमा करावी. मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचा विशेष सहाय्य योजनांतील लाभ तात्पुरता बंद होऊ शकतो, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी शाखेच्या वतीने श्रीमती कल्पना ढवळे व नायब तहसीलदार बाजीराव पाटील यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles