वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
रामकृष्ण वेताळ यांचा कृतीतून आदर्श; घोलपवाडी व शामगाव येथे वृक्षलागवड

कराड/प्रतिनिधी : –
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी घोलपवाडी आणि शामगाव येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पर्यावरण संरक्षणासाठी केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे अधोरेखित करत त्यांनी वृक्षलागवडीचा उपक्रम राबविला.
यावेळी बोलताना वेताळ यांनी, वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान, जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणीय असमतोल या गंभीर समस्यांवर वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असल्याचे सांगितले. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून अधिकाधिक वृक्षांची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.
वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्वही विशद केले. रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकांच्या अतिरेकामुळे पर्यावरणासह मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करत, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीपद्धती म्हणून सेंद्रिय शेतीचा स्वीकार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमात रघुनाथ शेंडगे, अमित पाटील, शशिकांत घोलप, गोरख पवार, पांडुरंग घोलप, संपत जाधव, रमेश जाधव, उपसरपंच बाळासाहेब पोळ, ग्रामपंचायत सदस्य राहुल यादव, संतोष कणसे, कृष्णत पोळ, बाबुराव पोळ, विजय पोळ, सचिन डांगे, अमोल डांगे, संभाजी पोळ, उद्धव पोळ, तेजस पोळ यांच्यासह घोलपवाडी व शामगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रामकृष्ण वेताळ यांच्या या उपक्रमाची परिसरात विशेष चर्चा होत असून, वृक्षलागवड आणि सेंद्रिय शेती या दोन्ही माध्यमांतून पर्यावरण संवर्धनाबरोबरच निरोगी समाज घडविण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.
वर्षभर पर्यावरणासाठी काम करणार
वाढत्या तापमानवाढीवर मात करण्यासाठी आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी वृक्षलागवड व सेंद्रिय शेती हेच प्रभावी पर्याय आहेत. लोकांमध्ये जनजागृती करून या दोन्ही उपक्रमांचा व्यापक प्रसार करण्यासाठी आम्ही वर्षभर प्रयत्नशील राहणार आहोत. पर्यावरण संवर्धनासोबतच नागरिकांचे आरोग्य सुधारावे, हेच आमचे ध्येय असल्याचे भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी सांगितले.


