सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी  शेवटच्या दिवशी ५१ अर्ज

एकूण १३९ नामनिर्देशनांमुळे कारखाना निवडणुकीत चुरस वाढली

कराड/प्रतिनिधी : –

रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीने आता खऱ्या अर्थाने राजकीय तापमान वाढवले असून, उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेच्या अखेरच्या दिवशीही इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शुक्रवारी (दि. २२) तब्बल ५१ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने एकूण अर्जांची संख्या विक्रमी १३९ वर पोहोचली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक अपर्णा यादव यांनी दिली. या निवडणुकीसाठी विक्रमी अर्जांमुळे ‘कृष्णे’च्या निवडणुकीत यंदा चुरशीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी (दि. २१) गुरुपुष्यामृत योगाचे औचित्य साधत जयवंतराव भोसले सहकार पॅनल आणि आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनलने मोठ्या शक्तिप्रदर्शनासह तब्बल ८४ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारीही इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करत निवडणूक रंगतदार बनवली. कारखान्याच्या राजकारणात विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनल आणि माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील आबासाहेब मोहिते सहकार पॅनल यांच्यात थेट लढत अपेक्षित मानली जात आहे. दोन्ही गटांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी मोठी मोर्चेबांधणी केल्याचे चित्र अर्ज प्रक्रियेदरम्यान दिसून आले.

विशेष म्हणजे, कारखान्याच्या निवडणुकीत अंतिमतः केवळ २१ उमेदवारांना अधिकृत उमेदवारी मिळणार असल्याने दोन्ही पॅनल प्रमुखांसमोर इच्छुकांची नाराजी रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक इच्छुकांनी ‘पॅनलकडून संधी न मिळाल्यास अपक्ष म्हणून मैदानात उतरणार’, अशी भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे अर्ज माघारीच्या टप्प्यापर्यंत राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान कारखाना परिसरात दिवसभर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, वाहनांच्या रांगा आणि समर्थकांच्या घोषणाबाजीमुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. दोन्ही प्रमुख गटांनी शक्तिप्रदर्शनावर भर दिल्याने आगामी निवडणूक प्रतिष्ठेची बनल्याचे स्पष्ट झाले आहे.

गटनिहाय उमेदवारी अर्जांची स्थिती पुढीलप्रमाणे; गट क्र. १ (वडगाव हवेली – दुशेरे) : २० अर्ज, गट क्र. २ (काले – कार्वे) : १५ अर्ज, गट क्र. ३ (नेर्ले – तांबवे) : २० अर्ज, गट क्र. ४ (रेठरे हरणाक्ष – बोरगाव) : २३ अर्ज, गट क्र. ५ (येडेमच्छिंद्र – वांगी) : १७ अर्ज, गट क्र. ६ (रेठरे बुद्रुक – शेणोली) : १४ अर्ज, महिला राखीव : ९ अर्ज, अनुसूचित जाती-जमाती : ७ अर्ज, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) : ७ अर्ज, विमुक्त जाती / भटक्या जमाती : ७ अर्ज, एकूण दाखल उमेदवारी अर्ज : १३९ आहेत.

आता पुढील टप्प्यात उमेदवारी अर्जांची छाननी, अर्ज माघार आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी (दि. ९) जून आहे. त्यानंतर रविवारी (दि. २१) प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मंगळवारी (दि. २३) मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ही निवडणूक आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, अधिकृत उमेदवारी, नाराज इच्छुकांची भूमिका आणि संभाव्य अपक्षांची संख्या यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles