कृष्णेच्या रणांगणात भोसले-उंडाळकर गटाचे मनोमिलन?
बाजार समितीतील भेटीने कराडच्या राजकारणात खळबळ; जिल्हा बँक आणि भविष्यातील समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना उधाण

कराड/प्रतिनिधी : –
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असतानाच कराड तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा जोर धरू लागली आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे प्रमुख नेते डॉ. सुरेश भोसले आणि भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलेल्या सदिच्छा भेटीने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
विशेष म्हणजे, बाजार समितीवर दिवंगत मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या गटाचा प्रभाव मानला जातो. सध्या त्यांच्या वारशाचे नेतृत्व उदयसिंह पाटील-उंडाळकर करत आहेत. भोसले आणि उंडाळकर गट हे अनेक वर्षे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राहिले असल्याने या भेटीकडे केवळ औपचारिक कार्यक्रम म्हणून पाहिले जात नाही. उलट, भविष्यातील राजकीय घडामोडींची नांदी म्हणूनच या भेटीची चर्चा सुरू झाली आहे.
गुरुवारी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्याआधी डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांनी बाजार समिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी माजी सभापती विजय कदम, संचालक मनुभाई पटेल आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमावेळी उदयसिंह पाटील-उंडाळकर अनुपस्थित होते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीपेक्षा भोसले गटाच्या या भेटीचीच राजकीय वर्तुळात अधिक चर्चा रंगली.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भोसले आणि उंडाळकर गटातील संघर्षाला मोठा राजकीय इतिहास आहे. दिवंगत विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी तब्बल साडेतीन दशके मतदारसंघावर प्रभाव राखला. त्यांच्याविरोधात आणि नंतर उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या विरोधात आमदार डॉ. अतुल भोसले यांनी निवडणुका लढवत स्वतंत्र राजकीय ताकद निर्माण केली. त्यामुळे या दोन गटांतील राजकीय अंतर कायम चर्चेचा विषय राहिले.
मात्र गेल्या काही महिन्यांत राज्यातील बदलत्या सत्तासमीकरणांचा परिणाम स्थानिक राजकारणावरही दिसू लागला आहे. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला, तर डॉ. अतुल भोसले हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. राज्यात भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता असल्याने स्थानिक स्तरावरही नव्या राजकीय जुळवाजुळवीची प्रक्रिया सुरू असल्याचे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर आगामी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका आणि सहकार क्षेत्रातील राजकीय ताकद लक्षात घेऊन काही वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही गटांमध्ये संवादाची भूमिका घेतल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार नितीन पाटील आणि माजी मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून राजकीय संवाद वाढल्याचे बोलले जात असून, कृष्णा कारखाना निवडणुकीत उंडाळकर गटाकडून भोसले गटाला अप्रत्यक्ष पाठबळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे कराड दक्षिणमधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, कृष्णा कारखान्याची निवडणूक आता केवळ सहकारापुरती मर्यादित न राहता भविष्यातील विधानसभा, जिल्हा बँक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची रंगीत तालीम ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
भोसले गटाच्या बाजार समिती भेटीनंतर उंडाळकर गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कार्यक्रमावेळी गटातील काही महत्त्वाचे कार्यकर्ते अनुपस्थित राहिल्याने विविध तर्कांना उधाण आले. काहींनी जाणीवपूर्वक कार्यक्रम टाळल्याची, तर काहींनी पूर्वनियोजित सहलींचे कारण पुढे केल्याची चर्चा रंगली. त्यामुळे संभाव्य राजकीय जवळीकीबाबत गटांतर्गत मतभेद उघड होत असल्याचे बोलले जात आहे.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेल्या हालचालींकडे आगामी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून पाहिले जात आहे. भोसले-उंडाळकर समीकरण प्रत्यक्षात आले, तर कराड दक्षिणच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा राजकारणातही या नव्या समीकरणांचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


