‘कृष्णा’तील अकरा वर्षांच्या कारभाराविरोधात रणशिंग – अविनाश मोहिते
सर्व जागांवर उमेदवार रिंगणात

कराड/प्रतिनिधी : –
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संस्थापक पॅनेलने सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. गेल्या अकरा वर्षांत कारखान्यात झालेल्या कथित गलथान कारभाराला विरोध करण्यासाठीच ही निवडणूक लढवत असल्याचा आरोप कारखान्याचे माजी चेअरमन तथा संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते यांनी केला.
गुरुवारी संस्थापक पॅनेलकडून सौ. अर्चना मोहिते यांच्यासह विविध उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अविनाश मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत सभासदांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कृष्णा कारखाना हा सभासदांचा असून त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी संस्थापक पॅनेल पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. मागील अनेक वर्षांतील कारभारामुळे सभासदांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी, अशी अपेक्षा सरकार आणि निवडणूक यंत्रणांकडून आहे, असे अविनाश मोहिते यांनी सांगितले.
दरम्यान, सौ. अर्चना मोहिते यांनीही संस्थापक पॅनेलची भूमिका स्पष्ट करत ही लढाई सत्तेसाठी नसून, शेतकरी सभासदांच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा आणि सभासदांचा सन्मान टिकून राहावा, यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. सर्व जागांवर सक्षम आणि शेतकरी हिताचा विचार करणारे उमेदवार देण्यात आले आले असल्याचे त्यांनी सांगितले.


