कराड अर्बन बँकेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारणार – अध्यक्ष समीर जोशी
रिझर्व्ह बँक व सहकार विभागाची मान्यता; महाराष्ट्रभर नवीन शाखांचे जाळे उभारण्याचा निर्णय

कराड/प्रतिनिधी : –
शतकोत्तर परंपरा लाभलेल्या कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या शेड्यूल्ड बँकेच्या विस्ताराला मोठी गती मिळाली असून, बँकेचे कार्यक्षेत्र आता संपूर्ण महाराष्ट्रभर वाढविण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सहकार विभागाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील विविध शहरांमध्ये नवीन शाखा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, बँकेच्या व्यवसायवाढीला मोठी चालना मिळणार आहे.
याबाबत बँकेचे अध्यक्ष समीर जोशी यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या बँकेच्या आठ जिल्ह्यांत ७२ शाखा कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांत सुरू करण्यात आलेल्या नव्या शाखांमधूनच तब्बल ४५० कोटी रुपयांचा अतिरिक्त व्यवसाय मिळाला आहे. राज्यभर विस्तार झाल्यानंतर ग्राहकसेवेच्या नव्या संधी निर्माण होणार असून, ग्रामीण व शहरी भागात बँकेची उपस्थिती अधिक मजबूत होईल.
बँकेचे उपाध्यक्ष शशांक पालकर म्हणाले, बदलत्या बँकिंग व्यवस्थेनुसार डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत आहे. ग्राहकांना यूपीआय आणि अन्य अत्यावश्यक डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आगामी काळात सर्व डिजिटल सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू असून, त्यासाठी आवश्यक तांत्रिक अंमलबजावणीही वेगाने सुरू आहे.
बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम म्हणाले, शंभर वर्षांहून अधिक काळाच्या प्रवासात बँकेने सातत्याने प्रगतीची परंपरा जपली आहे. आर्थिक वर्षात तब्बल ७५० कोटी रुपयांची व्यवसायवाढ नोंदविण्यात आली असून, सलग तीन वर्षे नक्त एनपीए शून्य टक्के राखण्यात बँकेला यश आले आहे. मार्च २०२६ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ६५०० कोटी रुपयांच्या पुढे गेला असल्याचे सांगताना ते म्हणाले, व्यवसायवाढीत सातत्य राखणे, शून्य एनपीए कायम ठेवणे आणि महाराष्ट्रभर बँकेचा विस्तार घडवून आणणे, हेच चालू आर्थिक वर्षातील प्रमुख उद्दिष्ट असेल.
दरम्यान, इंधनदरवाढ आणि राष्ट्रीय हित लक्षात घेऊन बँकेने इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विशेष कर्ज योजना जाहीर केली आहे. याबाबत बोलताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी, बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकींसाठी ७.७५ टक्के आणि चारचाकींसाठी ८.२५ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पर्यावरणपूरक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांच्या विश्वासामुळेच बँकेला राज्यभर विस्ताराची संधी मिळाली आहे. पारदर्शक सेवा, अचूक व्यवहार आणि ग्राहककेंद्रित धोरणामुळे बँकेने सातत्याने प्रगती साधली आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून आधुनिक सेवांवर भर दिल्यामुळेच बँक आजही विश्वासार्हतेचे प्रतीक बनली आहे.
– सुभाषराव जोशी (अर्बन कुटुंबप्रमुख व ज्येष्ठ संचालक)


