मसूर पूर्व भागासाठी ७ मे’ला आरफळ कालव्यातून सोडणार पाणी – आमदार मनोज घोरपडे
उन्हाच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या टंचाईवर उपाय

कराड/प्रतिनिधी : –
उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या मसूर पूर्व भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, येत्या ७ मे रोजी आरफळ कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.
चालू वर्षी तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने शेतीसाठी आवश्यक पाण्याची टंचाई जाणवत आहे. कोपर्डे लिंक कॅनॉल सुरू झाल्यानंतर या भागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती; मात्र यंदा तारळी धरणातील पाणीसाठा घटल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर कण्हेर धरणातील पाणी आरफळ कालव्यातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तारळी धरणातील गळती रोखण्यासाठी, तसेच आरफळ कालव्याचे लाईनिंग करून पाण्याची नासाडी टाळण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचेही आमदार घोरपडे यांनी स्पष्ट केले.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून या कामांचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मसूर पूर्व भागातील दुष्काळी परिस्थिती कायमची दूर करण्यासाठी हणबरवाडी-धनगरवाडी उपसा सिंचन योजना राबवण्यात आली असून, कोपर्डे लिंक कॅनॉलद्वारे तारळी धरणातील पाणी या योजनेत आणले जात आहे. सध्या विविध भागांतून पाण्याची मागणी वाढल्याने रोटेशन पद्धतीत काहीसा विलंब होत असला तरी, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
वीजपुरवठ्यासाठी ९० नवीन डीपी
शेतकऱ्यांना अखंड वीजपुरवठा मिळावा, यासाठी कराड उत्तरमध्ये ९० नवीन डीपी बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ज्या ठिकाणी कमी क्षमतेचे डीपी आहेत, तेथे उच्च क्षमतेचे डीपी बसवले जात असून, अतिरिक्त डीपीमुळे वारंवार होणारे बिघाड, फ्यूज उडणे आणि लोडशेडिंगची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.



