कराडमधील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावा
भाजपचे आग्रही मागणी; फेरीवाला झोन, पार्किंग व्यवस्था व कुत्र्यांच्या निर्भीजीकरणाबाबत तातडीने उपाययोजनांची कराव्यात

कराड/प्रतिनिधी : –
शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि शहराचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह समविचारी नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी सकाळी भाजपचे गटनेते विजय वाटेगावकर यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवक जयवंत पाटील, शिवाजी पवार, सुमित जाधव, गणेश पवार, वैष्णवी वायदंडे व आशुतोष डुबल यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांची भेट घेऊन विविध नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत कराड शहर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी स्वतंत्र अतिक्रमण नियंत्रण पथक स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. तसेच फेरीवाल्यांसाठी नियोजित झोन तातडीने जाहीर करून त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
शहरातील काही भाग ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्यापूर्वी सर्वेक्षण करून व्यापाऱ्यांशी चर्चा करावी, जेणेकरून कोणत्याही व्यवसायिकांचे नुकसान होणार नाही, अशी भूमिकाही मांडण्यात आली. याशिवाय वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय म्हणून त्यांच्या निर्भीजीकरणाची मोहीम राबविणे, तसेच शहरात सुस्थित पार्किंग झोन विकसित करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.
या सर्व मागण्यांवर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविल्याची माहिती गटनेते विजय वाटेगावकर व नगरसेवक आशुतोष डुबल यांनी दिली.
दरम्यान, शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयातून ठोस निर्णय अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.



