सातारा जिल्हाहोम

राज्याचा अर्थसंकल्प ‘विकसित महाराष्ट्र’ घडविण्याच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प – आमदार डॉ. अतुल भोसले

कराड/प्रतिनिधी : –

राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला महाराष्ट्र राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा राज्याला ‘विकसित महाराष्ट्र’ बनवण्याच्या दिशेने नेणारा असल्याचे उद्‌गार भाजपाचे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत काढले. महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते.

राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प विधानमंडळाच्या सभागृहात मांडला. या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिणमधील विविध प्रश्नांचाही वेध घेतला.

आ. डॉ. भोसले म्हणाले की, राज्य सरकारने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे. वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचा निर्णय हा आर्थिक शिस्तीला चालना देणारा असून, प्रामाणिक शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करणारा आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख करताना आ.डॉ. भोसले म्हणाले की, अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिसरी आणि चौथी मुंबई यांसारखे प्रकल्प राज्याच्या आर्थिक प्रगतीला गती देणारे आहेत. मुंबईला ग्रोथ इंजिन म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. २०१७-१८ मध्ये राज्याचा अर्थसंकल्प सुमारे ३ लाख कोटी रुपयांचा होता, तर आज तो ७ लाख ६९ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून “महाविस्तार” ॲपवर सुमारे ३० लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीच्या शक्यता निर्माण होत असून, शेतीमध्ये हवामान अंदाज, बाजार माहिती, कोल्ड स्टोरेज लोकेशन आणि कीड नियंत्रणासाठी ए.आय. आधारित प्रणालींचा वापर वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साखर उद्योगाबाबत बोलताना त्यांनी उसाच्या दर आणि साखरेच्या मिनिमम सेलिंग प्राईस (एम.एस.पी.) यामध्ये योग्य संबंध प्रस्थापित करण्याची गरज व्यक्त केली. उसाच्या दरात वाढ झाली तर साखरेच्या एम.एस.पी.मध्येही वाढ करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारावे, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

कृष्णा नदीकाठच्या गावांच्या विकासासाठी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प सादर करण्याचा मानस व्यक्त करताना, आ.डॉ. भोसले यांनी या प्रकल्पातून नदीकाठच्या गावांचे संरक्षण, पर्यटन विकास, बोटिंग सुविधा आणि अध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकारी तत्त्वावरील पाणीपुरवठा योजनांचे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीत हस्तांतरण करून त्यांचे आधुनिकीकरण करावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच साडेसात एचपीपर्यंतच्या कृषी पंपांचे वीज बिल माफ करण्याच्या निर्णयाप्रमाणे सहकारी पाणीपुरवठा योजनांनाही वीज बिल माफीचा लाभ देण्याबाबत सरकारने विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली.

डॉ. भोसले यांनी आपल्या मतदारसंघातील कापील – कोडोली पुलाच्या प्रलंबित कामाकडेही लक्ष वेधले. या प्रकल्पासाठी भूसंपादनामुळे बाधित झालेल्या २८ शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी भरपाई मिळत असल्याने, त्यांच्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्याचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनासाठी तसेच संगम माऊली मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले.

कराड विमानतळाच्या विकासासाठी निधी देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत आ.डॉ. भोसले यांनी रन वे ५ हजार फूटपर्यंत वाढवण्याचा निर्णय, नाईट लँडिंग सुविधा, इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम, प्रकाश योजना आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलची व्यवस्था यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

 

चौकट १

 

अजितदादांसोबतच्या आठवणींना उजाळा

 

१२ मार्च रोजी स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने गतवर्षीची आठवण सांगत आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी, दिवंगत उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, गेल्यावर्षी १२ मार्चला मी अजितदादांसोबत कराड ते मुंबई असा विमानप्रवास केला होता. आज ते असते तर यंदाही १२ मार्चला यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिवादन करण्यासाठी नक्कीच कराडला उपस्थित राहिले असते. त्यांच्या जाण्याने राजकारणामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही न भरून निघणारी आहे. इतके सक्षम आणि धडाडीचे नेतृत्व आज आपल्यात नाही, याचे मला मनापासून दुःख होते.

 

चौकट २

 

जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना

 

अर्थसंकल्पामध्ये सातारा जिल्ह्याला न्याय देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून झाल्याचे सांगत आ.डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की अर्थसंकल्पात अजिंक्यतारा किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी, तसेच संगम माऊली परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला आहे. या निर्णयांमुळे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे जतन होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच पर्यटनालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे या कामांबद्दल मी सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो.

Related Articles