कराडातील ज्येष्ठ समाजसेवक हाजी उस्मानगणी अल्ली मुल्ला यांचे निधन

कराड/प्रतिनिधी : –
शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कम्युनिस्ट विचारसरणीचे ज्येष्ठ नेते हाजी उस्मानगणी अल्ली मुल्ला (वय ७८) यांचे बुधवारी सायंकाळी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने कराड शहरासह सातारा जिल्ह्यातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
भाजी मंडई परिसरातील चांदणी चौक येथे वास्तव्यास असलेले मुल्ला यांनी लहानपणापासूनच समाजकार्याची वाट निवडली होती. मुस्लिम समाजातील विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत ते नेहमीच पुढाकार घेत. कराड शहरातील मोहरम तसेच पैगंबर मोहम्मद जयंती उत्सवाच्या आयोजनात त्यांनी अनेक वर्षे सक्रिय नेतृत्व केले. दिवंगत कॉम्रेड बादशाहभाई मुल्ला यांच्या पश्चात त्यांनी या उपक्रमांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
मुस्लिम समाजातील दफनविधी प्रक्रियेतही त्यांचा सातारा जिल्हाभर मानाचा सहभाग असे. समाजातील अडचणी सोडवणे, वाद मिटवणे आणि विविध घटकांना एकत्र आणणे यासाठी ते सदैव तत्पर असत. कम्युनिस्ट विचारसरणीशी निष्ठा ठेवत त्यांनी सामाजिक समतेचा संदेश आयुष्यभर जपला.
ते शाही ईदगाह कब्रस्तान ट्रस्टशी निगडित कार्यात सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
त्यांचे चिरंजीव साबीरमिया मुल्ला हेही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून शाही कब्रस्तान कमिटीचे संचालक आहेत. तसेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते कार्य पाहत असून हिंदू–मुस्लिम समाजात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. उस्मानगणी मुल्ला यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी कराड येथील ईदगाह मैदानात दफनविधी करण्यात आले.



