आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रसातारा जिल्हा

कराड उत्तरमध्ये भाजपाविरोधात असंतोषाचा उद्रेक!

‘किंगमेकर’ रामकृष्ण वेताळांच्या हकालपट्टीने राजकीय भूकंप ! जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता

कराड / विशेष प्रतिनिधी : –

लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावणारे, ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जाणारे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यासह तीन प्रमुख नेत्यांवर भाजपाने पक्षविरोधी कारवाई करत त्यांची थेट पाच वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केल्याने कराड उत्तरच्या राजकीय वर्तुळात अभूतपूर्व खळबळ उडाली आहे.

या कारवाईमुळे केवळ भाजपामधील अंतर्गत नाराजीच नव्हे, तर भाजपाविरोधात सर्वसामान्य मतदारांमध्येही तीव्र रोष निर्माण झाल्याचे चित्र सध्या कराड उत्तरमध्ये दिसून येत आहे.

सातारा जिल्हा भाजपा कार्यालयातून नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कराड उत्तरचे माजी अध्यक्ष ॲड. महादेव साळुंखे व सचिन थोरात यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करण्यात आल्याचे जाहीर करत त्यांची पाच वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, या निर्णयामागील कारणांपेक्षा या निर्णयामुळे पक्षाने आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला असल्याची भावना अधिक तीव्रपणे पुढे येत आहे.

तळागाळातून उभा राहिलेला संघर्षशील नेता

 

रामकृष्ण वेताळ यांनी उपसरपंच पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली.सुरुवातीपासूनच संघर्ष हा त्यांच्या राजकारणाचा अविभाज्य भाग राहिला.अनेक अडचणी, विरोध आणि मर्यादा असतानाही त्यांनी कधीही माघार घेतली नाही.

कराड उत्तरमध्ये भाजपाची संघटनात्मक स्थिती अत्यंत कमकुवत असताना त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि एकहाती जबाबदारी उचलत पक्षाचा प्रचार व संघटन मजबूत करण्याचे काम सुरू केले.वाडी-वस्ती, शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला अशा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत त्यांनी कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी केली. सामान्य माणसाशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका आणि सातत्यपूर्ण संपर्क यामुळे रामकृष्ण वेताळ हे कराड उत्तरमध्ये लोकांचा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हादरवणारा झंझावात

कराड उत्तर हा मतदारसंघ पूर्वापारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, या बालेकिल्ल्याला तडा देण्याचे काम रामकृष्ण वेताळ यांनी केले.त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने येथे झंझावाती प्रचार केला आणि त्याचे प्रतिबिंब लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील मतदारांच्या कौलातून स्पष्टपणे उमटले.या यशामागे रामकृष्ण वेताळ यांचे नियोजन कौशल्य,व्यवस्थापन क्षमता आणि कार्यकर्त्यांवरील घट्ट पकड हे निर्णायक घटक ठरले. त्यामुळेच पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत त्यांच्याबाबत विश्वास व आदराची भावना निर्माण झाली.

‘किंगमेकर’ म्हणून ओळख

कोणतीही निवडणूक असो, कराड उत्तरमध्ये उमेदवारांच्या विजय-पराभवाचे गणित रामकृष्ण वेताळ यांच्या भूमिकेशी जोडले जाते.

त्यांच्या रणनीती, बूथनिहाय नियोजन आणि मतदारांवरील प्रभावामुळे अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी निकालांची दिशा बदलल्याने विरोधकांनीही त्यांच्या ताकदीची दखल घेतली आहे.याच कारणामुळे राजकीय वर्तुळात त्यांना ‘कराड उत्तरचा किंगमेकर’ म्हणून संबोधले जाते.

हक्काच्या माणसावर कारवाई; भाजपाविरोधात रोष

असा पक्षासाठी अहोरात्र झटणारा, पक्षवाढीसाठी झगडणारा नेता अचानकपणे पक्षातून हाकलला गेल्याने कराड उत्तरमध्ये “भाजपाने आपल्या हक्काच्या माणसावर अन्याय केला” अशी भावना ठळकपणे पुढे आली आहे.भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला धडा शिकवण्याचा निर्धार मतदार करत असल्याचे वातावरण तयार झाले आहे.

अपक्ष फळी उभी; सहानुभूतीची लाट

भाजपाने डावलले असले तरी जनतेने रामकृष्ण वेताळ यांच्यावरचा विश्वास कायम ठेवला आहे.

याच विश्वासाच्या बळावर त्यांनी स्वतंत्र फळी उभी करत कोपर्डे हवेली, सैदापूर व मसूर गट आणि गणांमध्ये अपक्ष उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

या अपक्ष उमेदवारांना सध्या मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सहानुभूतीची लाट तयार झाल्याचे स्पष्ट संकेत राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केले जात आहेत.

भाजपासाठी धोक्याची घंटा?

रामकृष्ण वेताळ यांची हकालपट्टी भाजपासाठीच आत्मघातकी ठरणार का, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.

एकीकडे भाजपाविरोधात वाढता असंतोष, तर दुसरीकडे वेताळ समर्थित अपक्ष उमेदवारांची वाढती ताकद पाहता, या निवडणुका कराड उत्तरच्या राजकारणाचा समतोल बदलणाऱ्या ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles