आयुष्यमान स्पेशलमहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

मंद्रुळ–कोळे गटाचा शाश्वत विकास ‘आयडॉल’ साकारण्याचा डॉ. प्राची पाटील यांचा निर्धार

जनतेच्या आग्रहातून निवडणूक; रोजगार, शेतकरी सुरक्षा, शिक्षण-आरोग्यावर विशेष भर

कोळे / प्रतिनिधी : –

मंद्रुळ–कोळे गटातून निवडणूक लढवण्यामागची भूमिका स्पष्ट करताना डॉ. प्राची पाटील यांनी सांगितले की, “जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणे हाच माझा ठाम निर्धार आहे. विकास हा केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष जमिनीवर दिसला पाहिजे.”

युवकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवणे, शेतकऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे तसेच गावातच दर्जेदार शिक्षण व आरोग्य सुविधा निर्माण करणे हा आपला संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“जनतेच्या आग्रहातून आणि त्यांच्या विश्वासावर मी ही निवडणूक लढवत आहे. राजकारणात सक्रीय झाले तरी घराण्याचा जनेसेवेचा व समाजकार्याचा वारसा कधीही विसरणार नाही,” असेही त्यांनी नमूद केले.

रोजगाराचा अभाव व शेतकऱ्यांमधील भीती गंभीर

आपल्या भागातील प्रमुख अडचणींबाबत बोलताना डॉ. पाटील यांनी रोजगाराचा अभाव, बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेली भीती आणि अपुऱ्या शैक्षणिक सुविधा या समस्या गंभीर असल्याचे सांगितले.

स्थानिक पातळीवर कौशल्याधारित रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांसाठी संरक्षणात्मक उपाययोजना तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र उभारण्यावर आपला विशेष भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र व पारदर्शक यंत्रणा उभारली जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी, मुद्रा योजना, जल जीवन मिशन आदी योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.“सामाजिक बांधिलकीतून गावातील आवश्यक विकासकामे मंजूर करून घेण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहील,” असे त्यांनी नमूद केले.

महिला सक्षमीकरणातून समाज सबळ

महिला सक्षमीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करताना डॉ. पाटील म्हणाल्या, “महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर कुटुंब आणि समाज दोन्ही मजबूत होतात.”

त्यासाठी महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी, नेतृत्व विकास आणि आत्मविश्वास वाढवणारे विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

युवकांसाठी रोजगार व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन

युवकांसाठी स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच उद्योजकतेसाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.“युवकांनी निर्भिडपणे समाजकारण आणि स्वच्छ राजकारणात सक्रीय व्हावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

समाजकारणाला प्राधान्य देणारा दृष्टिकोन

राजकारणाबाबत भूमिका स्पष्ट करताना डॉ. पाटील यांनी सांगितले की, “राजकीय वारसा असला तरी समाजकारण प्रथम असायला हवे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी झाल्याशिवाय खरे नेतृत्व घडत नाही.”

विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया

मतदारांना संदेश देताना डॉ. प्राची पाटील म्हणाल्या, “विकास हा एखादा कार्यक्रम नसून ती एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे. कार्यक्रम संपतो, पण प्रक्रियेला शेवट नसतो. जनतेच्या अपेक्षेनुसार ही प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. त्यामुळे माझ्या या संकल्पपूर्तीसाठी सर्वांनी मला साथ द्यावी,” असे नम्र आवाहन त्यांनी केले.

Related Articles