सातारा जिल्हाहोम

विकासकामांसाठी निधी मिळवण्याची जबाबदारी माझी – रामकृष्ण वेताळ

कराड/प्रतिनिधी : –

कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील विकासकामांसाठी शासनाकडून निधी मिळवण्याची जबाबदारी माझी आहे. निधी कसा मिळवायचा याची जाण मला आहे, त्यामुळे निधीची चिंता करू नका. फक्त विजयी निर्धाराने कामाला लागा, असे प्रतिपादन कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी केले.

रिसवड, ता. कराड येथील अपक्ष उमेदवार विद्या वेताळ, कोपर्डे गणातील पंचायत समिती उमेदवार अमित पाटील व वाघेरी गणातील अपक्ष उमेदवार सौ. नीलम पिसाळ प्रचार सभेमध्ये त बोलत होते. यावेळी सोसायटीचे चेअरमन श्रीरंग चव्हाण, माजी पं. स. सदस्य सुरेश कुंभार, देवानंद चव्हाण, शिवाजी पाटील, प्रल्हाद भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. वेताळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्या पाठीवर हात आहे. त्यामुळे कोपर्डे हवेलीसह इतर भागासाठी निधीचा रतीब लावण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी आणि धनदांडगे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून मतदार संघ सुरक्षित ठेवण्यासाठी एकजूट होऊया. सदाशिव इंगवले यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये गुन्हेगारीकरण आणि बाजारीकरण यापासून कराड उत्तरचे राजकारण शुद्ध ठेवण्यासाठी रामकृष्ण वेताळ यांचे हात बळकट करण्याची विनंती केली.

यावेळी कोपर्डे गटाच्या उमेदवार सौ. विद्या वेताळ, पंचायत समिती गणाचे उमेदवार अमित पाटील व वाघेरी गणाचे उमेदवार सौ. नीलम पिसाळ यांनीही आपण जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विकास योजना आणि मदतीच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध राहू, असे आश्वासन लोकांना दिले.

याच कार्यक्रमांमध्ये वडोली निळेश्वर गावचे माजी उपसरपंच दयानंद पवार आणि त्यांच्या संपूर्ण गटांनी रामकृष्ण वेताळ यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यामुळे अपक्ष उमेदवारांचे मताधिक्य वाढण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमासाठी भानुदास पोळ, जालिंदर माने, अशोक थोरात, लालासो जगदाळे, अंकुश थोरात, संदीप बाबर, तानाजी इंगवले, दादासो इंगवले, नाना शिंदे यांच्यासह कोपर्डे हवेली जिल्हा परिषदेत गटातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत इंगवले, सूत्रसंचालन रामभाऊ सातपुते, तर आभार दीपक इंगवले यांनी मानले.

गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचून काढूया

या सभेला जमलेली प्रचंड गर्दी ही या मतदारसंघात होऊ घातलेले गुन्हेगारीकरणाचे बीज नाहीसे करणार आणि अपक्ष उमेदवारांचा विजय निश्चित करणारी आहे, याची खात्री होत आहे. गुन्हेगारीकरण हे यशवंत विचाराला हानिकारक आहे. त्यामुळे यशवंत विचार जपण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचून काढूया, असे आवाहन रामकृष्ण वेताळ यांनी उपस्थितांना केले.

Related Articles