उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिला जाधव कुटुंबीयांना धीर
अपघातातील मृत विदीप जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली सांत्वनपर भेट

कराड/प्रतिनिधी : –
बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तरडगाव (ता. फलटण) येथील जाधव कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली.
स्वतःच्या वैयक्तिक दुःखावर मात करत सुनेत्रा पवार यांनी स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांना धीर दिला. कुटुंबीयांच्या डोक्यावर मायेचा हात ठेवत, “तुम्ही एकटे नाही, कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या या शब्दांनी व उपस्थितीने शोकाकुल वातावरणात क्षणभर दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
कर्तव्यनिष्ठा आणि संवेदनशीलता यांचा समतोल राखत सुनेत्रा पवार यांनी जाधव कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला. या भेटीदरम्यान उपस्थित अनेक नागरिक भावूक झाले होते. कर्तव्य बजावत असताना माणुसकी आणि आपुलकी जपत त्यांनी दिलेला हा आधार अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती आली.


