उंब्रजच्या विकासाची दिशा ठरवणारी निवडणूक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

कराड/प्रतिनिधी : –
उंब्रज शहराच्या भविष्यातील विकासाचा निर्णायक क्षण सध्या जनतेच्या हाती असून, ही निवडणूक उंब्रजसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिवसेना ही आज राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची ताकद बनली असून, महिलांसाठी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
उंब्रज, ता. कराड येथील बाजारपेठ तळावर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऑनलाईन सहभाग घेत जनतेला संबोधित केले.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार तसेच कराड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेनेचे उमेदवार ॲड. महादेव साळुंखे, नयन निकम, सोमनाथ चव्हाण यांच्यासह पंचायत समिती गणांतील उमेदवार, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उंब्रजला नगरपंचायतीचा दर्जा देणे, घनकचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीसाठी आवश्यक सुविधा, रस्ते व उड्डाणपूल या सर्व प्रश्नांना येत्या एका वर्षात न्याय देण्यात येईल. मी प्रत्यक्ष सभेला येणार होतो; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे मन अत्यंत व्यथित आहे. माझी कर्मभूमी मुंबई असली तरी जन्मभूमी सातारा असून या मातीशी माझे नाते अतूट आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
गरीबीचे चटके जवळून पाहिले असून, आईची काटकसर अनुभवली असल्यामुळेच ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली, असे सांगत त्यांनी या योजनेला कुणीही धक्का लावू शकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. शब्द दिला की तो पाळायचा, हीच बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे, असेही ते म्हणाले.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या या भूमीतूनच महिलांच्या सन्मानासाठी देशातील पहिली ‘लाडकी बहीण’ योजना सुरू झाली, हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी यापूर्वी दिलेल्या ५० लाख रुपयांव्यतिरिक्त उर्वरित १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच व्यापारी संकुल, घनकचरा प्रकल्प, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांचे प्रश्न वर्षभरात मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला.
कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी, उंब्रज परिसरातील वाढत्या नागरीकरणाकडे लक्ष वेधत ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होणे गरजेचे असल्याचे सांगितले. घनकचऱ्याची समस्या, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी वाढीव निधी, व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुल, तसेच तासवडे औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या मागण्या त्यांनी मांडल्या. या सर्व प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच सकारात्मक निर्णय होतील, अशी जाहीर घोषणा उद्योगमंत्र्यांनी केली.
ग्रामीण भागाच्या विकासात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे महत्त्व अधोरेखित करत यादव यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी ॲड. महादेव साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


