आयुष्यमान स्पेशलताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्हाहोम

भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी सिद्धेश्वर पाटील यांची हॅट्रिक

सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

 कराड / प्रतिनिधी :-

कराड दक्षिणचे आमदार तथा भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांचे कट्टर समर्थक आणि सामाजिक-सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व सिद्धेश्वर पाटील (दादा) यांची भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था लिमिटेड, केसेच्या चेअरमनपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे सिद्धेश्वर पाटील यांनी चेअरमनपदाची हॅट्रिक साधत पुन्हा एकदा आपल्या कार्यावर सभासदांचा ठाम विश्वास संपादन केला आहे.

भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेत सभासदांनी एकमताने सिद्धेश्वर पाटील (दादा) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून शेतीला आवश्यक असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन, शेती उत्पादनात स्थैर्य आणणे आणि परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी सिद्धेश्वर पाटीलदादांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन कार्यकाळात त्यांनी संस्थेच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, शिस्तबद्ध व पारदर्शक केली असून शेतकरी आणि सभासदांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. याच कार्याची पोचपावती म्हणून त्यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.

निवडीनंतर बोलताना सिद्धेश्वर पाटील (दादा) म्हणाले, सभासदांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. या विश्वासाला तडा जाऊ न देता संस्थेच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील. पुढील काळात संस्थेच्या माध्यमातून पाणीपुरवठा अधिक प्रभावी करण्यासह प्रत्येक सभासदाच्या हिताचे निर्णय पारदर्शकपणे घेतले जातील. सर्वांच्या सहकार्याने संस्था अधिक सक्षम करण्याचा माझा प्रयत्न राहील.

या निवडीबद्दल कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेशबाबा भोसले, विनायक भोसले (बाबा) यांच्यासह भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे पदाधिकारी, सभासद व परिसरातील ग्रामस्थांनी सिद्धेश्वर पाटील (दादा) यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles