कराड नगराध्यक्षपदासाठी राजेंद्रसिंह यादवांचा उमेदवारी अर्ज दाखल

कराड / प्रतिनिधी :-
कराड नगरपालिका निवडणुकीत आज (रविवार) शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व यशवंत विकास आघाडीच्यावतीने माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, यशवंत विकास आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने कराड नगरपरिषद निवडणुकीसाठी विविध प्रभागांत प्रचाराला वेग आला असून आज राजेंद्रसिंह यादव अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाने केलेल्या विकासकामांबद्दल नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, कराड शहरात सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांपासून पायाभूत सुविधांपर्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर शिंदे गट सातत्याने काम करीत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मतदार पाठिंबा दर्शवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“नगराध्यक्ष पदाबाबत कोणतीही तडजोड नाही”
असा ठाम दावा व्यक्त केला होता. तरीही भाजपकडून महायुती संदर्भात चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात होते. यावर आज भाष्य करताना यादव म्हणाले,“चर्चा सुरू आहे. दोन दिवसात महायुतीबाबतची आमची अधिकृत भूमिका स्पष्ट करू.”
कराडच्या विकासासाठी 2056 चे व्हिजन….
यादव यांनी कराडच्या दीर्घकालीन विकास आराखड्याबाबतही महत्त्वाचे विधान केले. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराजे देसाई व शिवसेना संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या मार्गदर्शनानुसार अर्ज दाखल केला आहे. 2056 साली कराडची अंदाजे 3 लाख लोकसंख्या गृहीत धरून शहराचा मायक्रो विकास व्हिजन आम्ही मतदारांसमोर ठेवणार आहोत.”


