सातारा जिल्हाहोम

कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक

शासकीय अधिकारी व शेतकरी संघटनेच्या भरारी पथकाकडून तपासणी; वजनकाटा चोख

कराड/प्रतिनिधी : –

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा आपल्या अचूकतेमुळे नेहमीच ‘धर्मकाटा’ म्हणून ओळखला जातो. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने कारखान्याच्या वजनकाट्याची अचानक भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी भरारी पथकाच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी, प्रत्येकवेळी कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे नेहमीप्रमाणे कृष्णाच्या वजनकाट्याने ‘धर्मकाटा’ ही ओळख अबाधित ठेवली आहे.

सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी वजन काटे तपासणीबाबत आदेश काढले. यानुसार कराड तहसीलदार कार्यालयाचे निरीक्षण अधिकारी महादेव आष्टेकर, कराडचे वजनमापे निरीक्षक योगेश अग्रवाल, विशेष लेखा परीक्षक डी. एस. खाडे व एस. आर. सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. ए. गुरव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवानंद पाटील व उत्तम साळुंखे, शरद जोशी शेतकरी संघटनेचे तात्यासो पाटील,बळीराजा शेतकरी संघटनेचे सुनिल कोळी, बळीराजा शेतकरी संघटनेचे दिपक पाटील, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अशोक लोहार, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे विशाल पुस्तके यांनी संयुक्तपणे कारखाना कार्यस्थळाला अचानक भेट देऊन कारखान्याच्या ऊस वजन काट्याची तपासणी केली.

ऊसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे दिसून आल्याने कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला.

यावेळी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर सत्यजित घाडगे, केनयार्ड सुपरवायझर विजय मोहिते, स्टोअर किपर गोविंद मोहिते, संरक्षण अधिकारी संजय नलवडे, असिस्टंट ईडीपी मॅनेजर विक्रम थोरात आदी उपस्थित होते.

Related Articles