सातारा जिल्हाहोम

कराड दक्षिणमध्ये 76.26, तर उत्तरमध्ये 74.73 टक्के मतदान

कराड/प्रतिनिधी : –

कराड दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, (दि. 20) रोजी अतिशय चुरशीने मतदान झाले. सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचे कर्तव्य बजावले. सायंकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया संपेपर्यंत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 342 मतदान केंद्रांवर 76.26 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 356 मतदान केंद्रांवर 74.73 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिली.

बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत कराड दक्षिण मतदारसंघात 5.63 टक्के मतदान झाले होते. तर
उत्तरमध्ये 4.84 टक्के मतदान झाले.
सकाळी 10 वाजल्यानंतर मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. अनेक मतदान केंद्रांबाहेर मंडप उभारण्यात आले होते. त्यानंतर साडेअकरा वाजेपर्यंत दक्षिणमध्ये 19.71 टक्के, तर उत्तरमध्ये 18.57 टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजता दक्षिणमध्ये 36.58, तर उत्तरमध्ये 35.47 टक्के मतदान झाले. दुपारी 3 वाजता कराड दक्षिणमध्ये 52.56, तर
उत्तरमध्ये 52.03 टक्के मतदान झाले.
त्यानंतर सायंकाळी उन्हाचा पारा कमी झाल्यामुळे मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. सायंकाळी पाच वाजता कराड दक्षिणमध्ये 67.91 टक्के, तर उत्तर 67.23 टक्के मतदान झाले. सायंकाळी सहा वाजता कराड दक्षिणेत 76.26, तर उत्तरेत 74.73 टक्के मतदान झाले.

Related Articles