शंभूराज देसाई यांच्या प्रचार सांगता सभेचे आज तारळे येथे आयोजन

दौलतनगर / प्रतिनिधी :-
शिवसेना-महायुतीचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शंभूराज देसाई यांच्या निवडणूक प्रचाराची सांगता सभा रविवारी, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ०३ वाजता तारळे येथे आयोजित करण्यात आली आहे. या सांगता सभेविषयी मतदारसंघातील जनतेमध्ये उत्सुकता असून मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील निवडणूक प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या निवडणूक प्रचाराचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शंभूराज देसाई यांनी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून मतदारसंघातील जवळपास २०० गावांना भेटी देऊ मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला. त्यांच्या गावभेट दौऱ्याला मतदार बंधू-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात शंभूराज देसाई यांचे मोठ्या उत्साहात ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात केलेली विकासकामांवर भर देत आगामी काळात पाटण मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा संकल्प त्यांनी प्रचारादरम्यान मतदार बंधू-भगिनींपुढे मांडला. शंभूराज देसाई यांनी केलेल्या विकासकामांची माहिती गावोगावी मतदारच एकमेकांना देऊ लागले असून गणनिहाय केलेल्या कामांचा अहवाल शंभूराज देसाई यांच्या वतीने मतदारांपुढे मांडण्यात आला आहे. गुरुवारपासून पाटण आणि सुपने येथे सभा घेऊन शंभूराज देसाई यांच्या प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली असून रविवारी तारळे येथे त्यांच्या प्रचाराची सांगता सभा संपन्न होणार आहे. या सभेस शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले गट), आरपीआय (कवाडे गट), रयत क्रांती संघटना व मित्र पक्ष महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.