ताज्या बातम्यासातारा जिल्हाहोम

डिजिटल साधने वापरताना डोळ्यांची सुरक्षितता आवश्यक – डॉ. तात्याराव लहाने

कराड रोटरीचा पदग्रहण सोहळा उत्साहात; रोटरी कला प्रदर्शनाचे उद्घाटन

कराड/वार्ताहर : –

बदलत्या युगामध्ये आणि धावत्या जगात आपण डिजिटल तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो आहोत. डिजिटल तंत्रज्ञान जितके फायदेशीर, तितकेच योग्य काळजी न घेतल्यास ते घातकही आहे. विशेषतः या डिजिटल साधनांचा वापर करताना डोळ्याची सुरक्षितता जपणे आवश्यक असल्याचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे रोटरी क्लब ऑफ कराडचा 68 वा पदग्रहण सोहळा, तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीचा पदग्रहण सोहळा आणि डॉ. अस्मिता फासे निर्मित प्रतिबिंब रोटरी कला प्रदर्शनाचे उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमात ‘डिजिटल साधनांचा वापर व डोळ्यांचे आरोग्य’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमास रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राजीव रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कराड रोटरीचे नूतन प्रेसिडेंट रामचंद्र लाखोले यांनी मावळते प्रेसिडेंट बद्रीनाथ धस्के यांच्याकडून पदभार स्वीकारला. नूतन सेक्रेटरी आनंदा थोरात यांनी मावळते सेक्रेटरी शिवराज माने यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी क्लबच्या सर्व डायरेक्टर यांनीही पदभार स्वीकारला. या कार्यक्रमांमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सिटी प्रेसिडेंट अजीम कागदी, सेक्रेटरी प्रथमेश कांबळे व संचालक मंडळानेही आपला पदभार स्वीकारला.

डॉ. लहाने म्हणाले, आपण संकटे आणि समस्यांचा बाऊ न करता त्याला सामोरे गेल्यास नक्कीच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आज मोबाईल आणि संगणकाचा वापर करताना सुरक्षितता न बाळगल्याने अनेक गंभीर आरोग्याच्या समस्या उद्भवतात. संगणक, मोबाईलचा वापर करताना आपण किमान 45 सेंटीमीटर अंतर ठेवणे गरजेचे आहे. डोळ्यांच्या पापण्यांची ठराविक वेळेत उघडझाप झाली पाहिजे.‌ डिजिटल साधनांच्या लहरींचा परिणामही आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे आपण योग्य ती काळजी घेणे, हे आपल्या आरोग्य हिताचे आहे.

रोटरी क्लब ऑफ कराडने राबवलेले उपक्रम आणि कार्यक्रम प्रेरणादायी आहेत. भविष्यातही असेच काम क्लबचे प्रेसिडेंट रामचंद्र लाखोले व सेक्रेटरी आनंदा थोरात यांच्यासह सर्व संचालक मंडळ करतील, अशी आशाही डॉ. लहाने यांनी यावेळी व्यक्त केली.

राजीव रावळ यांनी कराड रोटरी आणि त्यांनी निर्माण केलेल्या विविध क्लबचे काम प्रेरणादायी असल्याचे सांगितले. बद्रीनाथ धस्के यांनी गतवर्षात केलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. प्रेसिडेंट रामचंद्र लाखोले यांनी चालू वर्षात राबवण्यात येणाऱ्या उपक्रम व कार्यक्रमाची माहिती दिली. जयंत जगताप यांनी शिकागो (अमेरिका) येथील रोटरी इंटरनॅशनल ऑफिसला भेट दिल्यानंतर मिळालेला अनुभव आणि पाहिलेल्या कामाची माहिती दिली.

यावेळी पॉल हॅरीस झालेल्या रोटरीयन मेंबरचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर वाहगाव येथील दिव्यांग व कर्णबधिर मुलीला कानातील अत्याधुनिक मशीन देण्यात आले. मधुमेह प्रोजेक्ट करत असलेल्या कामाबद्दल डॉ.राहुल फासे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कराड रोटरीचे सभासद म्हणून अरुण पाटील व डॉ. अनिल देसाई यांना पत्र देऊन सत्कार करण्यात आला. माजी खा. श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनीही पदग्रहण सोहळास शुभेच्छा दिल्या. सेक्रेटरी आनंदा थोरात यांनी आभार मानले. शुभांगी पाटील व किरण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सातारा कॉप्समधील सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी, विविध संस्था आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.

कलेचा अविष्कार दाखवणारे रोटरी कला प्रदर्शन

डॉ. अस्मिता फासे यांनी रेखाटलेली चित्रकलाकृती ही कलेचा अविष्कार दाखवणारी उत्कृष्ट अशा प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला मिळाले, याचा मला आनंद आहे. कलाकृतीचे कौतुकही करत डॉ. अस्मिता फासे या माझ्या विद्यार्थींनी असून त्याचा मला सार्थ अभिमान वाटत असल्याचेही डॉ. लहाने यांनी सांगितले.

Related Articles